राहुरी पोटनिवडणूकीत लढविणाऱ्या पेक्षा न लढणाऱ्यांची’च अधिक चर्चा

राहुरीत लढणाऱ्यांपेक्षा ‘न लढणाऱ्यांची’च चर्चा अधिक
राजरंग।शिवाजी घाडगे 
राहुरी विधानसंभा पोटनिवडणुकी साठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून राहुरी, नगर तालुका आणि पार्थेडी तालुक्यातील मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत एकूण सात उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज  ठेवले आहेत. यात भाजपाचे अक्षय कर्डीले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके, शिवसेनेचे बंडखोर अपक्ष रावसाहेब खेवरे तसेच अपक्ष उमेदवार म्हणून अर्थव म्हसे, सूर्यभान लांबे आणि महेश हापसे यांचा समावेश आहे. हे सर्व उमेदवार राहुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मतदान यंत्राद्वारे मतदान झाल्यानंतर मतमोजणी होऊन राहुरीचा नवा आमदार कोण होणार, हे स्पष्ट होईल.
मात्र या निवडणुकीत एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात लढणाऱ्या उमेदवारांपेक्षा ‘कोण निवडणूक लढले नाही’ याचीच चर्चा अधिक रंगत आहे. काही इच्छुकांनी उमेदवारी अर्ज न भरल्याने किंवा माघार घेतल्याने त्त्यांचे अभिनंदन केले जात असल्याचेही चित्र दिसत आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विविध पातळ्यांवर हालचाली झाल्या होत्या; मात्र त्या निष्फळ ठरल्या.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी राजकीय घडामोडीं बरोबर कुरघोडी लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर स्वतः राहुरीत येऊन तळ ठोकून होते. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिल्याने राजकीय समीकरणे बदलली. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे रावसाहेब खेवरे यांनीही अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपली ताकद दाखवण्याचा निर्णय घेतला.
अपक्ष उमेदवार अर्थव म्हसे, जे स्वतः कायद्याचे शिक्षण घेतलेले असून उच्च शिक्षणाची परंपरा असलेल्या कुटुंबातून आले आहेत, ते ‘रोड रोलर’ चिन्हावर प्रचार करत आहेत. समाजकार्याचा वारसा जपणारे सूर्यभान लांबे ‘ट्रम्पेट’ चिन्ह घेऊन मैदानात उतरले आहेत, तर युवा कार्यकर्ते महेश हापसे ‘किटली’ या चिन्हावरून प्रचार करत आहेत. सध्या महागाई आणि गॅसच्या दरवाढीचा मुद्दा गाजत असल्याने वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके ‘गॅस सिलिंडर’ या चिन्हासह मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. तर भाजपाचे युवा नेतृत्व अक्षय कर्डीले ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवत असून विजयासाठी जोरदार तयारी करत आहेत.
या निवडणुकीत अजूनही सस्पेन्स कायम आहे. कारण निवडणूक कोणत्या मुद्द्यावर फिरते आणि शेवटच्या टप्प्यात काय घडामोडी होतात, हे सांगणे कठीण असते. अक्षय कर्डीले यांच्या पाठीशी पक्षाची भक्कम साथ असून नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रचारयंत्रणा हाती घेतल्याने त्यांचा अनुभव कर्डीले यांना फायद्याचा ठरू शकतो. तसेच दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या कार्याचीही सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे विरोधक ‘अनुकंपा’ नव्हे तर लोकशाही बळकट करण्यासाठी आणि घराणेशाहीला विरोध करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसते. मात्र विरोधकांनी पूर्वी ज्या मुद्द्यांवर माजी आमदार प्रसाद तनपुरे यांच्याकडून सत्ता काबीज केली, त्या समस्या आजही कायम असल्याचे चित्र आहे. उलट गेल्या काही वर्षांत अनेक संस्था बंद पडल्या असून स्थानिक विकासाला खीळ बसल्याची भावना व्यक्त होत आहे.
राहुरीतील उद्योग-धंदे आणि रोजगाराच्या संधी कमी होत चालल्या असताना नव्या संधी निर्माण करण्याऐवजी अस्तित्वात असलेले रोजगारही धोक्यात येत आहेत, अशी नाराजी नागरिकांमध्ये आहे. केवळ निवडणुकीपुरते आश्वासन देऊन मतदारांना गोंजारण्याची परंपरा किती काळ चालणार, हा प्रश्नही आता मतदारांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार कोणत्या मुद्द्याला प्राधान्य देतात आणि अंतिम निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, पूर्वी ज्या मुद्द्यांवर सत्तांतर घडवून आणले गेले, त्या समस्या आजही कायम आहेत. उलट परिस्थिती अधिकच बिकट झाल्याची भावना जनतेत आहे. स्थानिक पातळीवरील उद्योग-व्यवसाय बंद पडत असताना नवीन संधी निर्माण करण्यासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. निवडणुकीच्या काळातच आश्वासनांची रेलचेल होते आणि नंतर मात्र त्याचा विसर पडतो, अशी मतदारांची भावना आहे.
या पार्श्वभूमीवर ‘न लढणाऱ्यां’ची चर्चा होणे हे राजकीय निराशेचे लक्षण मानावे लागेल. मतदारांना सक्षम, विश्वासार्ह आणि काम करणारा हवा असतो.
राहुरीच्या मतदारांनी या निवडणुकीकडे केवळ राजकीय स्पर्धा म्हणून न पाहता, आपल्या भविष्यासाठीचा निर्णय म्हणून पाहणे आवश्यक आहे. कोणता उमेदवार विकासाचे ठोस दृष्टिकोन मांडतो, स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे आणि पारदर्शक कारभार देऊ शकतो, हा  विचार देखील महत्वाचा आहे.
शेवटी, लोकशाहीची खरी ताकद ही मतदारांच्या जागरूकतेत असते म्हणुन मतदाराला राजा म्हटल जात. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर