राहुरीत फुलेले कमळ पवार याच्या पाॅवरने...?
राजरंग।शिवाजी घाडगे
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून “राहुरीत पुन्हा कमळ फुलेल की राष्ट्रवादीची ‘पॉवर’ ते खुडेल?” अशी जोरदार चर्चा रंगली आहे. ही निवडणूक आता केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेची लढत ठरताना दिसत आहे. दोन्ही दिग्गज नेते प्रचारासाठी राहुरीत येणार असल्याने निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे.
राहुरीच्या राजकीय इतिहासात 1998 मधील पोटनिवडणूक अत्यंत नाट्यमय ठरली होती. त्या वेळी पहाटेच्या फेरमतमोजणीत कमळ फुलले आणि चंद्रशेखर कदम हे अवघ्या 23 मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यांनी दिवंगत नेते रामदास धुमाळ यांचा पराभव केला होता. त्या निवडणुकीत एकूण 1 लाख 63 हजार 440 मतदारांपैकी 87 हजार 829 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामध्ये चंद्रशेखर कदम यांना 34,523, रामदास धुमाळ यांना 34,500 तर पंढरीनाथ पवार यांना 15,052 मते मिळाली होती. या निवडणुकीत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी कदम यांना उमेदवारी दिली होती आणि ते नाट्यमयरीत्या विजयी झाले.
त्या काळात शरद पवार यांची देवळाली प्रवरा येथे होणारी सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली होती. त्यांनी मुद्दाम तेथे जाणे टाळल्याची चर्चा झाली आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा कमळाला झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले गेले. अनेकांच्या मते, जर ती सभा झाली असती, तर निकाल वेगळा लागू शकला असता.
यानंतर राहुरीत कमळाचे वर्चस्व कायम राहिले. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांनी भाजपच्या माध्यमातून मतदारसंघात भक्कम बस्तान बसवले. राष्ट्रवादीवर नाराज होत त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आणि कमळ चिन्हावर निवडणूक लढवत विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रसाद तनपुरे यांचा पराभव केला होता. त्यानंतर कर्डीले यांचा प्रभाव सातत्याने वाढत गेला. 2014 मध्ये प्राजक्त तनपुरे यांना संधी मिळाली असली तरी 2019 मध्ये शिवाजी कर्डीले पुन्हा विजयी झाले.
मात्र, शिवाजी कर्डीले यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपने सहानुभूतीची लाट आणि कर्डीले कुटुंबाचा जनसंपर्क लक्षात घेऊन त्यांच्या सुपुत्र अक्षय कर्डीले यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देत जोरदार लढत उभी केली आहे. मोकाटे हे कर्डीले यांचे जुने राजकीय विरोधक मानले जातात.
दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने प्रयत्न केले होते; मात्र त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आता थेट भाजपा आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात सामना रंगणार आहे.
प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 20 एप्रिल रोजी राहुरीत सभा होणार आहे. तर खासदार शरद पवार स्वतः मैदानात उतरून राष्ट्रवादीची ‘तुतारी’ फुंकणार आहेत. त्यामुळे निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे.
एकीकडे सहानुभूती, सत्तेची ताकद आणि संघटनबळ; तर दुसरीकडे पवारांचा अनुभव, रणनीती आणि स्थानिक समीकरणे—या सर्वांचा कस या निवडणुकीत लागणार आहे. त्यामुळे “कमळ पुन्हा फुलेल की पवारांची ‘पॉवर’ ते खुडेल?” याचे उत्तर आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
Comments
Post a Comment