भाजपाला हवा प्राजक्त यांचा सहवास
राजरंग॥ शिवाजी घाडगे
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून, मतदारसंघात एकूण 3 लाख 33 हजार 545 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार केला आहे. मात्र, माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख नेते प्राजक्त तनपुरे यांना निवडणूक लढवण्यापासून परावृत्त करण्यात भाजपाला यश आले, अशी चर्चा असली तरी त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अनिश्चितता कायम आहे. सध्या ते मतदारसंघातही सक्रिय दिसत नाहीत.
या निवडणुकीत भाजपाने दिवंगत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे सुपुत्र अक्षय कर्डीले यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देत निवडणुकीत रंगत आणली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून नगरसेवक संतोष चोळके, तर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करत ‘तालुक्याच्या स्वाभिमानासाठी’ मैदानात उतरलो असल्याचे सांगितले आहे.
तसेच अपक्ष उमेदवार म्हणून अर्थव म्हसे, महेश हापसे, सूर्यभान लांबे यांच्यासह एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतदार नेमका कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर उमेदवार संतोष चोळके यांच्या साठी प्रचार संभा घेऊन आपली भुमिका स्पष्ट करणार आहेत.
दरम्यान, भाजपाकडून प्राजक्त तनपुरे यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असली तरी प्राजक्त तनपुरे आपले मामा आमदार जंयत पाटील याच्या बरोबर सल्लामसलत करून निर्णय जाहीर करतील.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर संवाद घडवून आणल्याचे सांगितले जाते. तरीही तनपुरे यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राहुरीतील सभेत “प्राजक्त तनपुरे आमच्यासोबत आले तर आनंदच होईल,” असे वक्तव्य केले. तर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनीही “अजून वेळ गेलेली नाही, प्राजक्त तनपुरे यांनी भाजपाला पाठिंबा द्यावा,” असे आवाहन केले आहे.
दरम्यान, येत्या सोमवारी 20 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरी येथे जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला प्राजक्त तनपुरे उपस्थित राहणार का, तसेच ते भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डीले यांना जाहीर पाठिंबा देणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
प्राजक्त तनपुरे यांनी अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर न केल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. कार्यकर्ते सध्या प्रतीक्षेत असून, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, उन्हाचा पारा चढत असतानाच राहुरीतील राजकीय तापमानही वाढले आहे. त्यामुळे ‘कमळाला प्राजक्तचा सहवास लाभणार का?’ हा प्रश्न सध्या मतदारसंघात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
Comments
Post a Comment