चहाची किटली मागे नाही हटली

चहाची किटली मागे  नाही हटली ‘सामान्य माणसाचा आवाज’ बनण्याचा निर्धार – महेश हापसे
घाडगे न्यूज| प्रतिनिधी
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार महेश हापसे यांनी आपल्या साध्या, पण ठाम भूमिकेमुळे मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. “चहा विकून नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात, तर ‘किटली’ हे निवडणूक चिन्ह घेऊन मी आमदार का होऊ शकत नाही?” असा सवाल उपस्थित करत हापसे यांनी आपला प्रचार अधिक आक्रमक केला आहे.
हापसे म्हणाले की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच आपल्याला मतदानाचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळाला आहे. त्या अधिकाराचा वापर करून मी राहुरी विधानसभा पोटनिवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवत आहे. माझा अनुक्रमांक सात असून ‘किटली’ हे माझे निवडणूक चिन्ह आहे. सामान्य मतदारांनी मला साथ द्यावी.”
सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, “सामान्य माणसाचा अवमान आणि अपमान झाला आहे. आता त्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. सत्तेचा वापर जनतेसाठी न करता स्वतःच्या फायद्यासाठी करण्यात आला, ही वस्तुस्थिती आहे. मी मात्र जनतेसाठी काम करण्याचा निर्धार केला आहे.”
आपल्या कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगताना हापसे म्हणाले, “माझे वडील केशव हापसे हे ब्राम्हणी गावचे ग्रामपंचायत सदस्य तसेच महात्मा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष होते. मी सामान्य व गरीब कुटुंबातून आलो आहे. माझे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राहुरी महाविद्यालय येथे झाले. शिक्षणासाठी मी दररोज सायकलने प्रवास केला.”
तरुणांना आवाहन करताना त्यांनी स्पष्ट केले की, “राजकारणावर टीका करण्यापेक्षा तरुणांनी स्वतः पुढे येऊन निवडणुका लढवायला हव्यात. आज तरुणांच्या हातात रोजगाराऐवजी झेंडे दिले जात आहेत, ही चिंताजनक बाब आहे.”
राहुरीच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी बारामती आणि लोणी येथील विकासाचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केला, “तेथे विकास होतो, मग राहुरीत का नाही?”
“मी निर्व्यसनी, शाकाहारी असून समाजसेवेची प्रामाणिक इच्छा आहे. कुस्तीपटू म्हणूनही माझी ओळख आहे. मतदार नक्कीच बदल घडवतील,” असा विश्वासही महेश हापसे यांनी व्यक्त केला.
“किटली मागे हटणार नाही,” असा ठाम संदेश देत त्यांनी मतदारांना आपल्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर