राहुरीत तनपुरे फॅक्टर ची चाहुल
राजरंग।शिवाजी घाडगे
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक केवळ एका जागेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांची चाचणी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची भूमिका केंद्रस्थानी आली असून, ते या निवडणुकीतील ‘किंगमेकर’ ठरू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच सध्या तनपुरे फॅक्टर ची चाहुल महत्त्व प्राप्त झाले असून ते आपल्या कार्यकत्याशी विचार विनिमय करुन आपला निर्णय घेणार आहे ही निवडणूक भावनिक आहे कारण राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांचे अकस्मात निधन झाल्याने ही निवडणूक लढणे सयुक्तिक नाही अथवा विरोधात निवडणूक जावुन तालुक्यातील विकास कामे होणार नाही
राजकारणात केवळ पक्षनिष्ठा नव्हे, तर व्यक्तिमत्त्व आणि स्थानिक प्रभावही तितकाच महत्त्वाचा ठरतो. प्राजक्त तनपुरे यांचे व्यक्तिमत्त्व संयमी, सुसंवादी,सुशिक्षित,निरव्यसनी, चारित्र्य संपन्न आणि सर्वपक्षीय नेत्यांशी सलोखा राखणारे आहे. त्यामुळेच ते कोणत्याही एका पक्षाच्या चौकटीत मर्यादित न राहता व्यापक स्वीकारार्हतेचे नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत. हीच त्यांची ताकद आज सर्व पक्षांना आकर्षित करत आहे.
भाजपाकडून तनपुरे यांना आपल्या बाजूला खेचण्याचे सुरू असलेले प्रयत्न हे केवळ या पोटनिवडणुकीपुरते मर्यादित नाहीत. त्यामागे भविष्यातील राजकीय बळकटीकरणाचा स्पष्ट विचार दिसून येतो. नगर जिल्ह्यात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी आणि प्रभावी स्थानिक नेतृत्व आपल्या गोटात सामावून घेण्यासाठी भाजपाने आखलेली ही दीर्घकालीन रणनीती असल्याचे स्पष्ट होते.
दुसरीकडे, प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ वैयक्तिक नाही, तर तो एक राजकीय संदेशही देणारा आहे.
स्थानिक प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवण्याची त्यांची भूमिका मतदारांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचवणारी ठरू शकते. मात्र, याच निर्णयामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत.
आता सर्वांचे लक्ष त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे लागले आहे. या मेळाव्यातून तनपुरे कोणती भूमिका जाहीर करतात, यावर राहुरीतील निवडणुकीचे पारडे मोठ्या प्रमाणात झुकू शकते. ते भाजपाच्या प्रचारात सक्रिय सहभागी होणार का, की तटस्थ भूमिका घेणार, यावर अनेक राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.
राहुरीतील ही निवडणूक त्यामुळे केवळ उमेदवारांमधील लढत न राहता, स्थानिक नेतृत्व, पक्षीय रणनीती आणि मतदारांच्या अपेक्षांचा संगम ठरत आहे. ‘तनपुरे फॅक्टर’ हा या सर्व प्रक्रियेत निर्णायक ठरणार का, याचे उत्तर लवकरच मिळेल; मात्र इतके नक्की की, या निवडणुकीने राहुरीच्या राजकारणाला नवे वळण दिले आहे.
Comments
Post a Comment