छत्रपतीचे विटबनेतील अज्ञात आरोपी अद्याप मोकाट

छत्रपतींच्या विटंबनेचा आरोपी अद्याप मोकाट; राहुरी पोलिसांनी जाहीर केले ११ हजारांचे बक्षीस, पण आरोपी कधी सापडणार?
घाडगे न्यूज @प्रतिनिधी 
राहुरी शहरातील बुवासिंग बाबा तालीम परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध लावणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा राहुरी पोलिसांनी गुरुवारी केली. मात्र या घटनेला दीड वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही आरोपीचा शोध लागलेला नाही, ही बाब केवळ खेदजनक नसून संपूर्ण यंत्रणेसाठी लाजिरवाणी मानली जात आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि कोट्यवधी जनतेच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होते आणि दीड वर्ष उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. गुन्हेगारांना शोधून काढण्याचा दावा करणाऱ्या यंत्रणांना एका विटंबनाखोराचा माग काढता आलेला नाही, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात अन्याय, अत्याचार आणि स्त्रियांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली होती. न्याय आणि शिस्त हे त्यांच्या राज्यकारभाराचे मुख्य तत्त्व होते. अशा महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्याला कायद्याच्या चौकटीत राहून कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी जनतेची तीव्र भावना आहे.
दरम्यान, राहुरी शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरही नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी, वाढती बेशिस्त वाहतूक, खुलेआम सुरू असलेले अवैध व्यवसाय आणि नियमांची होत असलेली पायमल्ली यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेकदा प्रमुख रस्त्यांवर तासन्‌तास वाहतूक ठप्प होत असते, मात्र त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाही.
अधिकारी येतात, बैठका होतात, आश्वासने दिली जातात; परंतु प्रत्यक्षात परिस्थितीत अपेक्षित बदल दिसत नसल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून जनभावनांचा सन्मान करण्याचीही गरज आहे.
आज प्रश्न फक्त ११ हजारांच्या बक्षिसाचा नाही, तर छत्रपतींच्या सन्मानाचा आणि कायद्यावरील जनतेच्या विश्वासाचा आहे. त्यामुळे आरोपीला शोधून न्यायालयापुढे उभे करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी आता जोर धरत असताना राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची अचानक बदली झाली आणि नुतन पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठांच्या अतिथीगृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमे समोर एकमेकांचे बुके देत स्वागत केले. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन