कर्तव्यासोबत पर्यावरण संरक्षण पोलीस हवालदार सागर दाणी यांचे उल्लेखनीय कार्य

कर्तव्यासोबत माणुसकी, पर्यावरण व वारसा संवर्धनाची जपणूक; पोलीस हवालदार सागर दाणी यांचे उल्लेखनीय कार्य
घाडगे न्यूज।@प्रतिनिधी 
अहिल्यानगर  चांदबिबी पुनःप्रक्षेपण केंद्र येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार सागर दाणी यांनी आपल्या शासकीय कर्तव्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतानाच पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण, ऐतिहासिक वारसा जतन आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रांतही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या विविध उपक्रमांमुळे प्रशासन, पर्यावरण आणि समाजसेवा यांचा प्रभावी समन्वय साधला जात असून समाजात एक सकारात्मक आदर्श निर्माण होत आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात सागर दाणी यांनी सातत्यपूर्ण आणि परिणामकारक काम केले आहे. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनावर भर देत त्यांनी वन्यजीवांसाठी पाणवठ्यांची निर्मिती, जंगलातील वणवे विझविण्यासाठी प्रत्यक्ष सहभाग, वन्यजीवांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी जनजागृती आणि संरक्षणात्मक उपाययोजना राबवल्या आहेत. तसेच जैवविविधतेस बाधक ठरणाऱ्या आक्रमक विदेशी वनस्पतींचे निर्मूलन करून देशी वृक्षांच्या बियांचे संकलन, रोपनिर्मिती आणि लागवडीचे उपक्रम हाती घेतले आहेत. पर्यावरण संरक्षणाशी संबंधित अनेक स्वयंसेवी मोहिमांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
चांदबिबी पुनःप्रक्षेपण केंद्र परिसराच्या विकासासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. विविध शासकीय विभागांशी सातत्याने समन्वय साधत परिसरात आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे केंद्राच्या विकासकामांना गती मिळाली असून परिसरातील नागरिकांनाही त्याचा लाभ होत आहे.
इतिहास आणि वारसा संवर्धनाबाबतही सागर दाणी यांची तितकीच तळमळ दिसून येते. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चांदबिबी महाल परिसराची स्वच्छता, संरक्षण आणि संवर्धनासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन ते विविध माध्यमांतून करीत असतात.
सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेकांना संकटातून बाहेर काढण्याचे मोलाचे कार्य केले आहे. आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या चार व्यक्तींना वेळेत मदत, वैद्यकीय उपचार आणि समुपदेशन उपलब्ध करून देत त्यांना नवजीवन मिळवून दिले. त्यांच्या या कार्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचली असून त्यांनी खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ची भूमिका बजावली आहे.
वन्यजीव संरक्षणाच्या मोहिमेदरम्यान अडचणीत सापडलेल्या दोन वन्यजीव रक्षकांना तातडीची मदत करून त्यांचे प्राण वाचविण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच विविध रस्ते अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेल्या तीन नागरिकांना तत्काळ मदत करून रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे संबंधितांना जीवदान मिळाले.
याशिवाय, सुट्टीच्या दिवशी भारतीय सेनेच्या परिसरात लागलेली आग विझविण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धाडसी प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी जीवित व वित्तहानी टळली. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत एम.आय.सी. अँड एस.चे कमांडंट मनोजकुमार यांनी सागर दाणी आणि त्यांच्या ‘टीम बायोडायव्हर्सिटी ग्रुप’चा विशेष सन्मान केला होता.
कर्तव्यनिष्ठा, माणुसकी, पर्यावरण संरक्षण, वन्यजीव संवर्धन आणि ऐतिहासिक वारसा जतन या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे पोलीस हवालदार सागर दाणी हे समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरत आहेत. त्यांच्या कार्यातून समाजाप्रती असलेली जबाबदारी, संवेदनशीलता आणि सेवाभाव अधोरेखित होत असून अनेक युवकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन