तनपुरे सहकारी साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांची आत्महत्या
राहुरी : तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी बाळासाहेब तारडे यांनी राहत्या घरात समोरील लिंबाच्या झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कारखाना परिसरासह कामगार वसाहतीत शोककळा पसरली असून कामगारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद असल्याने अनेक कामगारांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. रोजगार नसल्याने आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाल्याने अनेक कामगार मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अशाच परिस्थितीत बाळासाहेब तारडे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, तनपुरे साखर कारखान्याच्या कामगार वसाहतीत घडलेली ही दुसरी आत्महत्येची घटना असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कारखाना बंदीमुळे निर्माण झालेल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
मृत बाळासाहेब तारडे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, मुले तसेच दोन विवाहित मुली असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment