जळगावच्या केळी संशोधन सुधार केंद्रात केळी दिवसा निमित्त शिवार फेरी
राहुरी
केळी पिकामध्ये सुधारित लागवड पद्धतींच्या वापराबरोबर रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन केल्यास तसेच उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याच्या शिफारशींची अंमलबजावणी केल्यास उत्पन्नात निश्चितच वाढ होईल. नवीन संशोधन निष्कर्षांवर आधारित प्रयोगांची आखणी यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने केळी उत्पादनात व उत्पनात वाढ होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत केळी संशोधन केंद्र, जळगाव येथे फुले कृषि महोत्सव-2026 अंतर्गत केळी दिवस व शिवारफेरी या कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, धुळे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बबनराव इल्हे, नंदुरबार कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए.बी. होले, मुक्ताईनगर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड जळगावचे डॉ. के. बी. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जळगाव श्री. कुरबान तडवी, केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अरुण भोसले, जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दीपक दहाट व जळगाव कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती उपस्थित होते.
डॉ. गोरक्ष ससाणे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तांत्रिक चर्चासत्रामध्ये कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनील कदम यांनी नियंत्रित केळी उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व ड्रोन वापर याविषयीचे प्रगत तंत्रज्ञान, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड यांनी केळी प्रक्रिया व उत्पादन, डॉ. के. बी. पाटील यांनी नियंत्रित केळी लागवडीतील आढळणारे अडथळे व उपाय, जळगावचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. कुरबान तडवी यांनी जळगाव जिल्ह्यातील केळी पिकाची सद्यस्थिती व नियंत्रित आकडेवारी व कृषिविद्यावेता डॉ. उल्हास सुर्वे यांनी केळीसाठी जमीन आरोग्य व्यवस्थापन या विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यावेळी केळी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष श्री. संदीप पाटील व उपाध्यक्ष श्री. विनोद बोरसे यांनी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आधुनिक केळी लागवड, संशोधन पुस्तिका, केळीवरील करपा, पनामा व कुकुंबर मोजक व्हायरस या विषयांवरील घडी पत्रिकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेंद्रिय शेती करणार्या शेतकर्यांना आदर्श शेती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवारफेरीमध्ये उपस्थित असलेल्या केळी उत्पादक शेतकर्यांना देशभरात लागवडीखाली असलेल्या तब्बल 80 केळी वाणांची एकाच ठिकाणी प्रायोगीक लागवड संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर बघण्याची संधी मिळाली. यामध्ये फुले प्राईड, अर्धापुरी, वसई, श्रीमंती, ग्रँड नाईन, विल्यम्स, बसराई, राजापुरी इ. केळीच्या प्रगत वाणांच्या प्रात्यक्षिकांचा समावेश होता.
Comments
Post a Comment