अखेर ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात असलेला पोलीस शामसुंदर शासकीय सेवेतुन बडतर्फ

ड्रग्ज प्रकरणातील अटक : पोलीस शामसुंदर गुजर सेवेतून बडतर्फ
घाडगे न्यूज | प्रतिनिधी
अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस हवालदार शामसुंदर विश्वनाथ गुजर यास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस सेवेतून बडतर्फ केल्याचे आदेश जारी केले आहेत.
अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) येथे कार्यरत असलेला पोलीस हवालदार शामसुंदर गुजर याच्याविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५३/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (ब) व २१ (क) अंतर्गत दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल होऊन त्यास अटक करण्यात आली होती.
तपास अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार शामसुंदर गुजर याचा अंमली पदार्थ तस्करीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, तोफखाना पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर ७६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६ (५) व ३१८ (४) अन्वये अपहार व फसवणूक प्रकरणी दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, पोलीस हवालदार शामसुंदर विश्वनाथ गुजर यास भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (ब) नुसार शासकीय सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी निर्गमित केले आहेत.
दरम्यान, या कारवाईनंतर “शामसुंदर हा केवळ छोटा मासा असून मोठ्या माशांवर कारवाई कधी?” अशी खमंग चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. या निर्णयामुळे अनेक पोलिसांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, नगरचे आमदार संग्राम जगताप यांनीही जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन या प्रकरणासंदर्भात निवेदन सादर केले असल्याची माहिती आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन