आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मुळे अहिल्यानगर ठरला राज्यात सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

प्राजक्त तनपुरे यांच्या निवडीमुळे अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा
घाडगे न्यूज @प्रतिनिधी 
 महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने आता आणखी एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विधान परिषद निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीमुळे जिल्ह्यातील एकूण आमदारांची संख्या १९ वर पोहोचली असून, राज्यातील सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा म्हणून अहिल्यानगरची नोंद झाली आहे. हा विक्रम राज्याच्या राजकीय इतिहासात विशेष मानला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि अल्पावधीतच उमेदवारी जाहीर होऊन त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या घडामोडीची मोठी चर्चा रंगली.
सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभेचे १२ आणि विधान परिषदेचे ७ असे एकूण १९ आमदार आहेत. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक ९ आमदार असून, अजित पवार गटाचे ५, शिवसेना (शिंदे गट) चे २ तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि एक अपक्ष असे प्रत्येकी १ आमदार आहेत. या संख्याबळामुळे जिल्ह्याचे राज्याच्या राजकारणातील महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे.
राहुरी, कर्जत-जामखेड, संगमनेर, कोपरगाव, श्रीगोंदा आणि पाथर्डी या मतदारसंघांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक आमदारांचे प्रतिनिधित्व असल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अधिक प्रभावी मानली जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, कृषी, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावामुळेही जिल्ह्याचे राजकीय वजन वाढले आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने भाजपला एक शांत, संयमी, सुशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्व लाभल्याची भावना पक्षातील अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासन, सहकार आणि विकास विषयांवरील त्यांचा अभ्यास लक्षात घेता, भविष्यात राज्याच्या राजकारणात त्यांची भूमिका अधिक प्रभावी ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीत प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये स्थान देत त्यांच्यावर विश्वास दाखविला. त्यानंतर त्यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाल्याचे मानले जात आहे.
याशिवाय विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे देखील अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे विधान परिषदेत जिल्ह्याचे अस्तित्व अधिक ठळक झाले आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या निवडीनंतर अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या आघाड्या, नवी समीकरणे आणि भविष्यातील नेतृत्वाच्या शक्यतांबाबत चर्चांना वेग आला असून, जिल्ह्याचे राजकीय महत्त्व आणखी वाढल्याचे चित्र दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन