अहिल्यानगर च्या शासकीय रुग्णालयांच्या 981पदाना शासकीय मान्यता
घाडगे न्यूज @विशेष बातमी
अहिल्यानगर येथे उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी आवश्यक ९८१ पदनिर्मितीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यास मान्यता मिळाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाचे कार्यक्षम संचालन, दर्जेदार आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाला मोठी गती मिळणार आहे.
राज्यातील निमशहरी, ग्रामीण, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांना अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त १०० विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
शासन निर्णयानुसार रुग्णालयासाठी गट-अ, गट-ब आणि गट-क संवर्गातील ५१५ नियमित पदे तसेच बाह्यस्त्रोत (आउटसोर्सिंग) पद्धतीने ४६६ मनुष्यबळ सेवा अशा एकूण ९८१ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. ही पदे चार टप्प्यांत भरली जाणार असून पहिल्या टप्प्यातील पदभरतीला तातडीने सुरुवात करण्यात येणार आहे.
या पदनिर्मितीमुळे वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, लिपिक, वाहनचालक तसेच विविध तांत्रिक आणि सहाय्यक पदांवर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे रुग्णालयातील सर्व विभागांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होऊन रुग्णांना अधिक परिणामकारक, जलद आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होईल.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पामुळे केवळ आरोग्यसेवाच सक्षम होणार नाही, तर वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान या आगोदर जिल्ह्यात खासगी वैद्यकीय महाविद्यालय असले तरी राज्य शासनाचे स्वतःच असे वैद्यकीय महाविद्यालय या मुळे जिल्ह्यात होईल
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे नागरिकांमधून सांगितले जात आहे.
Comments
Post a Comment