श्रीरामपूरात काॅगेसाचा हात बळकट
घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे
श्रीरामपूर नगरपालिकेत दिवंगत माजी आमदार जयंत ससाणे यांचे चिरंजीव व जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक करण ससाणे हे जनतेतून निवडून येत नगराध्यक्ष झाले आहेत. ते ससाणे कुटुंबातील तीसरे नगराध्यक्ष झाल्याने येथे नगराध्यक्ष पदाची हॅटट्रीक त्यांच्या रुपाने साधली गेली आहे.
करण ससाणे यांना २४,७२४ मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे श्रीनिवास बिहाणी यांना १७,९५७ मते, तर शिवसेनेचे प्रकाश चित्ते यांना ८,०८६ मते मिळाली. एकूण ९ उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी नशीब आजमावले होते.
करण ससाणे यांनी ६,०६७ मतांच्या आघाडीने विजय संपादन केला. भाजप व शिवसेना शिंदे गट वेगवेगळे लढल्याचा फायदा ससाणे यांना झाला. सत्ताधारी पक्ष आपसातील संघर्षात अडकले असताना करण ससाणे यांनी रणनीतीने भाजपच्या ‘कमळा’ला धक्का देत बिहाणी यांचा राजकारणातील श्रीगणेशा रोखण्यात यश मिळवले.
निवडणूक काळात काँग्रेसचे नेते सचिन गुजर यांच्या अपहरणाचा व जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा प्रकार घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. श्रीरामपूर रेल्वेच्या पलीकडील परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर करण ससाणे यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. आमदार हेमंत ओगले यांनी प्रशासनाला धारेवर धरत मतदारांवर दडपशाही करणाऱ्यांना मतदान केंद्रांपासून दूर केले.
भाजपचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांनी जोरदार प्रचार केला. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तब्बल २८ सभा घेतल्यामुळे भाजपचे १० नगरसेवक निवडून आले. काँग्रेसचे २०, शिवसेनेचे ३ आणि १ अपक्ष असे एकूण ३४ नगरसेवक श्रीरामपूर नगरपालिकेत निवडून आले आहेत.
शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश चित्ते धनुष्यबाण घेऊन उभे राहिले होते, मात्र त्यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात भूमिका बजावली.
खाजगी सावकारांवर गुन्हे दाखल झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट निर्माण झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाचा समारंभ खाजगी असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. शहरात “छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हेच” असे बॅनर ठिकठिकाणी झळकत होते. या मुद्द्यांवर जनजागृती करत बाह्य हस्तक्षेप थांबवण्याचा प्रचार प्रत्यक्षात उतरवण्यात करण ससाणे यशस्वी ठरले.
माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना श्रीरामपूरकरांनी सपशेल नाकारले. मागील वेळी त्यांनी करण ससाणे यांच्या मातोश्री राजश्री ससाणे यांचा पराभव करून नगराध्यक्षा पद मिळवले होते; मात्र यावेळी त्या प्रभागातून नगरसेवकही होऊ शकल्या नाहीत. यावरून त्यांचा कारभार जनतेला न पटल्याचे स्पष्ट झाले.
करण ससाणे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याशी समन्वय साधला होता. शिवसेनेसोबत असतानाही मुरकुटे यांना आपल्या कुटुंबातील उमेदवार निवडून आणताना मोठी कसरत करावी लागली.
करण ससाणे यांनी अधिकृत काँग्रेसच्या ‘पंजा’ चिन्हावर निवडणूक लढवून नगराध्यक्ष पद पटकावले. स्थानिक पातळीवर मातब्बर नेते आघाडी करून लढत असतानाही ससाणे यांनी थेट पंजावर विजय मिळवला.
दिवंगत आमदार जयंत ससाणे, माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे आणि आता करण ससाणे — अशा प्रकारे नगराध्यक्ष पदाची हॅटट्रिक ससाणे कुटुंबाने साधली आहे.
सतत जनतेच्या सुख-दुःखात सहभागी राहणे, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा स्वभाव आणि सक्रिय कार्यशैली यामुळेच श्रीरामपूरकरांनी पुन्हा एकदा करण ससाणे यांच्यावर विश्वास टाकला आहे. शहराची धुरा पुन्हा ससाणे यांच्या हाती देत काँग्रेसचा हात बळकट केला आहे.
मात्र नगरपालिकेत १३ विरोधी नगरसेवक निवडून आल्याने विकास करताना सर्वांचे विचार समन्वयाने घेण्याचे आव्हान ससाणे यांच्यापुढे असणार आहे.
Comments
Post a Comment