दादा जरा दमान पाय काढू नका पायावर उभे करा

दादा, जरा दम्यानं… पाय काढू नका, लोकांना पायावर उभं करा

भाष्य घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे 
देवळाली प्रवरा नगरपालिकेत पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून सत्यजित कदम यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे. मात्र विजयानंतर झालेल्या आभार सभेत “पाय काढण्याची” भाषा वापरणे योग्य नाही, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
आपल्या पदाचा आणि पक्षाचा उपयोग लोकांना पायावर उभे करण्यासाठी व्हायला हवा. कारण तुमचे पाय खेचण्याचे प्रयत्न करणारे लोक तुमच्या पक्षातही आहेत, हे वास्तव आहे. सलग दुसऱ्यांदा नगराध्यक्ष होणारे तुम्ही देवळाली प्रवराचे पहिलेच नगराध्यक्ष आहात. तुमचे वडील माजी आमदार चंद्रशेखर कदम हेही अवघ्या एका मताने नगराध्यक्ष झाले होते आणि पुढे राहुरीचे आमदार बनले. कदाचित तुम्हीही भविष्यात आमदार व्हाल, मात्र सध्या तरी दादा, जरा दम्यानं वागण्याची गरज आहे.
तसे पाहिले तर नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासाठी ही निवडणूक वैयक्तिकदृष्ट्या फारशी अवघड नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अप्रत्यक्ष मदत मिळाल्याचे बोलले जाते. शिवाय केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने “देवळालीत पुन्हा भाजपलाच सत्ता द्यायला काय हरकत आहे?” असा विचार मतदारांमध्ये झाला आणि त्याचा फायदा कदम यांना झाला.
मुळात सत्यजित कदम यांच्या काही कार्यकर्त्यांनी “आम्ही पुढे आलो नाही, तर हे लोक दिवसा तुमच्या घरात शिरतील” अशी भीती निर्माण करून निवडणूक पूर्णतः सत्यजित कदम यांच्या भोवती केंद्रित केली. दरम्यान, रात्री दोन समाजांमध्ये हाणामाऱ्या झाल्या. त्या मिटवण्यासाठी गेले असताना सत्यजित कदम यांच्या डोक्याला फलक लागला. तो फलक लागला की घातला, हे पोलीस तपासातून स्पष्ट होईल. मात्र त्याच रात्री एका कुटुंबावर टोळक्याने हल्ला केला, गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले, मोटारसायकली व घरांची तोडफोड झाली. हे सर्व कोणी केले, हेही पोलीस तपासातून निष्पन्न होईल. मात्र हे सगळे प्रकार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घडवून आणले गेले असावेत, अशी चर्चा आहे.
विजयानंतरच्या आभार सभेत विद्यमान नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी, “आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले, तरी मी पाय काढल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत संयम ठेवला आहे, अंत पाहू नका,” असा इशारा दिला. कदाचित हे वक्तव्य कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी केले असेल. मात्र दुसऱ्यांचे पाय काढण्यापेक्षा, तुमच्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करा, औद्योगिक वसाहती उभारा.
निवडणूक संपली आहे. आता तुम्ही देवळाली प्रवरा शहराचे नगराध्यक्ष आहात, केवळ कार्यकर्त्यांचे नाही. त्यांनी तुमची मान उंच करण्यासाठी खांदा दिला, हे खरे आहे; पण आज जनता तुम्हाला कणखर नेतृत्व म्हणून पाहत आहे. राहुरी बाजार समितीवरही तुम्ही एकटेच निवडून आलात, हे विसरता कामा नये.
गेल्या काही काळाचा अपवाद वगळता भाजपाचेच सरकार आहे. देवळाली प्रवरासाठी भाजपाने काय दिले, असा प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी करत नाही, हेही वास्तव आहे. अशा परिस्थितीत दिवंगत नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी कोणताही राजकीय आधार नसताना या शहरात जी विकासकामे केली, ती आजही उदाहरण म्हणून दिली जातात. स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी नगरपालिकेला महाराष्ट्रात नावारूपाला आणले आणि कोट्यवधी रुपयांची बक्षिसे मिळवून दिली.
तुमच्या वडिलांना थेट पंतप्रधानांकडून फोन येतो, याचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी करा. तनपुरे सहकारी साखर कारखान्यासाठी केंद्राचे पॅकेज मंजूर करून घ्या. मात्र पाय काढण्याची भाषा टाळा. तुमचे कुटुंब भाजपाशी एकनिष्ठ असल्याने, होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य किंवा विधान परिषद निवडणुकीत पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणू शकतो. त्यामुळे दादा, आता जरा दम्यानं, अंगावर भरलेला गुलाल सांभाळून वागा.
शहरात सध्या गुण्यागोविंदाने वातावरण आहे. पालिकेत भाजपचे पंधरा  सदस्य असले तरी विरोधी बाकांवर सहा सदस्य आहेत. त्यामुळे “तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ” ठेवून, प्रेमालाही हेवा वाटावा असे काम करा. उलट ज्यांना पाय नाहीत, त्यांना सत्यजित कदम फाउंडेशनच्या माध्यमातून जयपूर फूटसारखे कृत्रिम पाय देऊन खऱ्या अर्थाने पायावर उभे करा, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर