भाजपा होतोय का आया राम गया राम पक्ष?
चर्चा घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे
भाजपमध्ये ‘आया राम–गया राम’ संस्कृती वाढत असल्याचा आरोप आता उघडपणे होऊ लागला आहे. याबाबत अलिकडेच माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आवाज उठवला. कोणतीही तमा न बाळगता त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उघड विरोध दर्शवला. याआधी पक्षातील ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री पंकजा मुंडे तसेच “मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे,” तसेच विनोद तावडे यांनाही अशाच प्रकारची वागणूक मिळाल्याचे जनतेसमोर आले आहे.
दरम्यान, गुरुवारी नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या, स्वतःला सर्वात मोठा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपमध्ये असे बेशिस्त वातावरण निर्माण होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. तपोवन येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून आधीच तापलेले नाशिक, आता भाजपमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे अधिकच तापले आहे. साधु नाशकात येण्या आधीच राजकीय सधी साधुनी संधी साधली.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमाला यामुळे गालबोट लागले. कार्यक्रम कार्यालयाबाहेरच गदारोळात अडकला. परिस्थिती इतकी गंभीर झाली की शहरातील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. कदाचित हे आंदोलक विरोधी पक्षाचे असते, तर पोलिसांनी तात्काळ लाठीचार्ज केला असता; मात्र सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याने पोलीस केवळ प्रेक्षकाची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसून आले.
‘आया राम–गया राम’ नेत्यांचे भाजपमध्ये स्वागत आणि त्याचवेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय, हे चित्र अस्वस्थ करणारे आहे. सत्ता मिळाल्यावर नेत्यांना केवळ स्तुती ऐकण्याची सवय लागते. निष्ठावंत कार्यकर्ते मात्र प्रश्न विचारतात; तर ‘आया राम–गया राम’ नेते सत्तेच्या गणितात पटाईत असतात, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नाशिक, जो शिवसेना व मनसेचा बालेकिल्ला मानला जातो, तेथे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवून ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. मात्र याच शहरात, याच नेत्यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
या पक्षप्रवेशाआधी नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत पक्षप्रवेशाला विरोध केला. मीडिया वर आपल्याला विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, भाजप कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे यतीन वाघ, दिनकर पाटील आणि काँग्रेसचे शाहू खैरे हे आपल्या समर्थकांसह उपस्थित झाले. ही बाब समजताच फरांदे यांच्या कार्यालयाबाहेर जमलेला निष्ठावंतांचा फौजफाटा थेट भाजप कार्यालयावर धडकला आणि परिस्थिती चिघळली.
“आम्ही अनेक वर्षांपासून पक्षात एकनिष्ठेने काम करत आहोत. ज्यांनी नेहमी पक्षावर टीका केली, आंदोलनाच्या वेळी वरिष्ठ नेत्यांना शिवीगाळ केली, त्यांनाच आज पायघड्या घातल्या जात आहेत,” असा संताप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. मंत्री गिरीश महाजन यांनी कसेबसे कार्यकर्त्यांना शांत करत श्रद्धा व सबुरीने वागण्याचा सल्ला दिला. मात्र भाजपात निष्ठेला स्थान उरले नाही आणि आता आपले येथे काहीही काम नाही, अशी भावना निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे
दिवंगत विधानपरिषद संभापती देवयानी यांचे सासरे म्हणायचे
लबाड इमले बाधीती बाथीती माड्या
गुणवताताना मात्र झोपड्या
पती वरतेच्या गळ्यात धोडा
वेश्यांना मनी हार
देंवद्रा अजब तूझे सरकार
Comments
Post a Comment