माध्यमावर माझा विश्वास-माजी मंत्री प्राजक्त तनपुरे

मध्यमे समाजातील सर्व घटकाचा आवाज आहेत-माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 
राहुरी।प्रतिनिधी 
माध्यमे समाजातील सर्व स्तरांच्या व्यथा मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात. त्यामुळेच आजही पत्रकारांवर समाजाचा विश्वास आहे. याच विश्वासाच्या बळावर लोकशाही भक्कमपणे उभी आहे, असे मत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.
मराठी पत्रकार दिनाच्या औचित्याने राहुरी नगर परिषदेच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की, लोकशाहीतील चार स्तंभांपैकी कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळावरचा माझा विश्वास हळूहळू उडत चालला आहे, कारण या ठिकाणी बहुमताच्या जोरावरच निर्णय घेतले जातात. मात्र न्यायपालिका आणि पत्रकारिता या तिसऱ्या व चौथ्या स्तंभावर माझा अजूनही ठाम विश्वास आहे.
ते पुढे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात केवळ दूरदर्शन माध्यम होते; मात्र आज मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतील असंख्य वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे उपलब्ध आहेत. प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवणारे पत्रकार राहुरीत कार्यरत आहेत, याचा मला अभिमान आहे. समाजातील चुकीच्या बाबी, गैरप्रकार तसेच सत्ताधाऱ्यांवरही निर्भीडपणे प्रहार करताना कोणतीही वक्रदृष्टी न बाळगता पत्रकार समाजासाठी काम करत आहेत. समाजातील चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी निर्भयपणे मांडण्याचे कार्य पत्रकार करतात. ज्येष्ठ पत्रकारांप्रमाणेच युवक पत्रकारांच्या लेखणीतही धार दिसून येत आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करताना ते म्हणाले की, आज कायदा तोडणाऱ्यांनाच समाजात मान-सन्मान मिळत आहे. अशीच मंडळी जर कायदेमंडळात बसत असतील, तर त्या व्यवस्थेकडून कोणतीही अपेक्षा ठेवता येत नाही. कायदेमंडळ ही राज्याच्या तिजोरीचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय करणारी व्यवस्था बनली आहे. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदारांमधील मारामाऱ्या सर्वांनी पाहिल्या. कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही बहुमताच्या जोरावर अध्यादेश आणि कायदे मंजूर केले जातात, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
आपल्या राजकीय अनुभवाचा उल्लेख करताना प्राजक्त तनपुरे म्हणाले की, खाजगी विधेयक मांडणीसाठी शुक्रवार राखीव असतो. कृषी विद्यापीठातील भरती प्रक्रियेदरम्यान प्रकल्पग्रस्तांसाठी असलेले ५ टक्के आरक्षण २५ टक्क्यांवर नेण्याचे खाजगी विधेयक मी मांडले होते. प्रकल्पग्रस्तांची संख्या मर्यादित ठेवण्याचा त्यामागील उद्देश होता. मात्र प्रत्येक शुक्रवारची वाट पाहता पाहता आमदारकीही गेली, तरी ते विधेयक सभागृहात चर्चेला आले नाही; ही लोकशाहीची मोठी शोकांतिका आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत हराळे, गटनेते हर्ष तनपुरे, पत्रकार संजय कुलकर्णी, सुनील भुजाडी, विलास कुलकर्णी आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रतीक तनपुरे, सोन्याबापू जगधने, भारत भुजाडी, निलेश जगधने, आरिफ शेख, बबन गुलदगड, नंदकुमार तनपुरे, रवींद्र आहेर, संतोष आघाव, सचिन राऊत, नरेंद्र शिंदे, प्रशांत डौले तसेच नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने राहुरी नगर परिषदेच्या वतीने तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन