पुण्याच्या ड्रग्ज तस्करीला नगर पोलिसांचा सहभाग

पुण्याच्या ड्रग्ज तस्करीला नगर पोलिसांचा हातभार?
एलसीबीच्या कारवाईने पोलीस दलात खळबळ
 राहुरी।घाडगे न्यूज 
पुणे जिल्ह्यात वाढत चाललेल्या ड्रग्ज तस्करीच्या जाळ्याला मोठा धक्का देत पुणे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शिरूर परिसरात कारवाई करत गॅरेज चालक शदाब शेख याला अटक केली आहे. या कारवाईत तब्बल २ कोटी १० लाख रुपयांचा ड्रग्ज व अन्य मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून तपासादरम्यान नगर पोलिस दलातील एका पोलिसाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
एलसीबीकडून कसून चौकशी केल्यानंतर ड्रग्ज तस्करीच्या या साखळीत केवळ बाहेरील गुन्हेगारच नव्हे, तर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले काही घटकही सहभागी असल्याचा संशय बळावला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला पुणे एलसीबीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून पुढील चौकशी सुरू आहे.
पोलीस दलाची विश्वासार्हता धोक्यात
महत्त्वाची बाब म्हणजे, याआधी काही दिवसांपूर्वीच मल्टीस्टेट आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी पैसे घेतल्याच्या आरोपांमुळे पोलीस दल अडचणीत आले होते. आता थेट ड्रग्ज तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग उघडकीस येत असल्याने, “आता आणखी कोणकोणत्या बेकायदेशीर धंद्यांत पोलीस गुंतले आहेत?” असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
तरुण पिढी व समाजावर गंभीर परिणाम
ड्रग्ज तस्करीमुळे समाजात, विशेषतः तरुण पिढीमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे. अशा परिस्थितीत संरक्षकच भक्षक ठरत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
या प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच संपूर्ण ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करावा, अशी मागणी सामाजिक संघटना व नागरिकांकडून होत आहे.
ही घटना म्हणजे केवळ एका गुन्ह्याचा पर्दाफाश नसून, पोलीस यंत्रणेतील भ्रष्टाचार व गुन्हेगारी साटेलोट्याचा गंभीर इशारा असल्याचे मानले जात आहे. आता वरिष्ठ अधिकारी आणि राज्य शासन या प्रकरणाकडे कशी दखल घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर