खाकी आड लपलेली गुन्हेगारी पोलिस शामसुंदर जेल के अंदर
रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे
नगर जिल्ह्यात घडलेले ड्रग्ज प्रकरण हे केवळ एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपकृत्य नाही; ते संपूर्ण पोलीस व्यवस्थेच्या ढासळलेल्या मूल्यव्यवस्थेचे भयावह प्रतिबिंब आहे. कायदा राबवणारा हातच जर कायद्याला हरताळ फासत असेल, तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर, हा प्रश्न आज उघडपणे उभा ठाकला आहे.
एलसीबीसारख्या संवेदनशील शाखेत कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी शामसुंदर गुजर थेट ड्रग्ज तस्करीत अडकतो, ही बाब जितकी धक्कादायक आहे, तितकीच ती व्यवस्थेच्या अपयशाची कबुली आहे. श्रीरामपूर व संगमनेर येथील कारवाईत जप्त केलेल्या मेफेड्रोनमधून १० किलो एमडी गायब होते, ही घटना अपघात नाही, तर अंतर्गत संगनमताशिवाय अशक्य असा गुन्हा आहे.
हा मुद्देमाल कडेकोट बंदोबस्तात, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कस्टडीत असताना त्याऐवजी मैदा भरला जातो, याचा अर्थ स्टॉक रूम सुरक्षित नव्हती की सिस्टीम प्रामाणिक नव्हती? याचे उत्तर आजही मिळालेले नाही. एकटा पोलीस कर्मचारी २५ कोटींचा खेळ करतो, ही थिअरी जनतेच्या बुद्धीला अपमान करणारी आहे. एकट्याने चोरी होते, पण एवढा मोठा व्यवहार व्यवस्थेशिवाय होत नाही, हे वास्तव स्वीकारावेच लागेल.
याआधीही नगर एलसीबीवर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप झाले आहेत. शिर्डीतील प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करावा लागला. तरीही सुधारणा झाली नाही, याचा अर्थ कारवाई ही व्यक्तीपुरती मर्यादित ठेवली गेली; सिस्टीम मात्र मोकळीच राहिली.
राजकीय पातळीवरून वारंवार इशारे दिले गेले. विधानसभेत प्रश्न उपस्थित झाले, पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. पण प्रशासनाने ते गांभीर्याने घेतले नाही. आज त्या दुर्लक्षाचे दुष्परिणाम जनतेसमोर उभे आहेत.
या साऱ्या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब म्हणजे माहितीचा अपारदर्शकपणा. पुणे पोलिसांकडून स्थानिक माध्यमांना सविस्तर माहिती देण्यात आली नाही. पारदर्शकतेचा अभाव हा संशयाला खतपाणी घालणारा असतो, हे प्रशासन विसरू शकत नाही.
सामान्य नागरिकांना चारित्र्य पडताळणीसाठी महिने लागतात. मग खाकीतील चारित्र्याची तपासणी कोण करणार? हा प्रश्न केवळ नैतिक नाही, तर लोकशाहीच्या आरोग्याशी निगडित आहे.
आज शामसुंदर गुजर जेलमध्ये आहे. पण हा शेवट नाही, तर सुरुवात असायला हवी. या प्रकरणात फक्त आरोपी नव्हे, तर संरक्षक यंत्रणेतली सडलेली फांदी तोडली गेली पाहिजे. अन्यथा रक्षकच भक्षक बनण्याची ही साखळी तुटणार नाही.
गृहमंत्र्यांनी या प्रकरणात थेट लक्ष घालून स्वतंत्र, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक चौकशी आदेशित करणे ही आजची गरज आहे. कारण प्रश्न फक्त ड्रग्जचा नाही, प्रश्न आहे लोकशाहीच्या रक्षणाचा.
खाकी स्वच्छ नसेल, तर समाज कसा सुरक्षित राहणार?
Comments
Post a Comment