ड्रग्ज लपवले कोणाच्या घरात पुणे पोलिस नगर एलसीबीच्या दारात

ड्रग्ज कोठे लपवले कोणाच्या घरात?
पुणे पोलिस नगर एलसीबीच्या दारात 
रिपोर्ट घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे 
नगर ड्रग्ज प्रकरणातील खाकीमागचा काळा चेहरा
नगर ड्रग्ज प्रकरणाने संपूर्ण पोलीस खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. नगर गुन्हा अन्वेषण विभागातील पोलीस कर्मचारी शामसुंदर गुजर याला पुणे स्थानिक गुन्हे शाखेने ड्रग्ज मुद्देमाल गायब केल्याच्या आरोपावरून अटक केली आणि खाकीतील गुन्हेगारीचा धक्कादायक पर्दाफाश झाला.
मात्र या प्रकरणात प्रश्न अनेक आहेत आणि उत्तरे फारच कमी.
शामसुंदर गुजर जिल्ह्यात नेमक्या कोणाच्या साथीने हे ‘पांढरपेशा’ गुन्हे करत होता?
ड्रग्ज नेमके कोठे लपवले जात होते?
कोणाच्या घरात, कोणाच्या आशीर्वादाने हा काळा धंदा फोफावत होता?
विशेष म्हणजे, एलसीबीमध्ये येण्यापूर्वी पारनेर पोलीस ठाण्यात शामसुंदर गुजर वादग्रस्त ठरला होता. मग अशा कर्मचाऱ्याला कोणाच्या शिफारशीवर नगर स्थानिक गुन्हे शाखेत घेण्यात आले? हा प्रश्नही अनुत्तरितच आहे.
चर्चा अशी आहे की मुद्देमाल कक्षातून ड्रग्ज काढून त्याच वजनाचा तत्सम पदार्थ ठेवला जायचा आणि मूळ ड्रग्ज विक्रीस काढला जायचा. न्यायालयाकडून नाशाची परवानगी मिळाल्यावर तो मुद्देमाल नष्ट झाला असता, तर हे संपूर्ण प्रकरण कदाचित कधीच उजेडात आले नसते. मात्र शिरूर येथे गॅरेज चालक शदाब शेख पकडला गेला आणि त्यातून शामसुंदर गुजरचा सहभाग उघडकीस आला. त्यामुळे ‘खाकीआडचा गुन्हेगारी काळा चेहरा’ जनतेसमोर आला.
नगर, श्रीरामपूर, संगमनेर आणि शिरूर या भागांत ड्रग्जची साखळी कशी पसरली, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. तरीही तपासात कोण आडवी तगडी घालत आहे?
कायद्याच्या नावाखाली गोपनीयतेचे ढाल पुढे केले जात आहे का, की काही बड्या हस्तींचा दबाव आहे?
आज परिस्थिती अशी आहे की अनेक पोलीस राजकीय नेते व गुन्हेगारांचे जणू घरगडी बनल्यासारखे वावरताना दिसतात. दिवसा ढवळ्या कायद्याला हरताळ फासला जातो. यामुळे सामान्य नागरिकांचा कायद्यावरील विश्वास ढासळतो, तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिसांचे मनोबल खचते. ते खचता कामा नये, हीच अपेक्षा.
या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी ड्रग्ज प्रकरणातील इतर आरोपींची नावे आठ दिवसांत जाहीर करण्याची मागणी केली आहे. तर त्यांचे वडील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही शिर्डीतील जाहीर सभेत पोलिसांच्या कारभाराबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती.
राज्याचे गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी या प्रकरणात नार्को टेस्टसह कठोर कारवाईचा विचार करून ड्रग्जच्या गर्तेत ओढल्या जाणाऱ्या युवक पिढीला वाचवावे, हीच  जनतेची ठाम अपेक्षा आहे.
खाकी वाचवायची असेल, तर गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांची नावे जाहीर करावीच लागतील.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर