कुंभ मेळ्या आगोदर विकास कामे पुर्ण करा-विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम
राहुरी ।
नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी व शिंगणापूर येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरू असलेली सर्व विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. शिर्डी विमानतळाचे विस्तारीकरण तसेच रस्त्यांच्या कामांचा वेग वाढवून ती कुंभमेळ्यापूर्वीच पूर्ण करावीत. गर्दीचे नियोजन करताना प्रशासकीय सोयीपेक्षा भाविकांच्या सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी दिल्या.
आगामी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा (२०२६–२७) यांच्या अनुषंगाने शिर्डी–शिंगणापूर परिसरातील भाविकांच्या गर्दीच्या नियोजनाबाबत साईबाबा मंदिराच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. प्रवीण गेडाम म्हणाले की, शिर्डी विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांचा वेग वाढवून पुढील सहा महिन्यांत ही कामे पूर्ण करण्यात यावीत. रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी ‘कोपरगाव पॅटर्न’ राबवावा. शिर्डी हे टर्मिनस स्थानक असल्याने गाड्या वळविण्यास वेळ लागतो. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना कोपरगाव येथे थांबा देऊन तेथून बसेसद्वारे भाविकांना शिर्डीत आणण्याचे नियोजन करावे.
शिर्डी–राहाता बायपास रस्त्याच्या कामाचा दर्जा उत्तम राहील, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. या कामाची व वापरण्यात येणाऱ्या साहित्याची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. त्रुटी आढळल्यास संबंधित काम पुन्हा करण्याचे निर्देश दिले जातील. नगर–मनमाड महामार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व भाविकांचा वेळ वाचवण्यासाठी ‘शिर्डी ते त्र्यंबकेश्वर’ थेट बससेवा सुरू करावी. तसेच जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मनमाडकडून येणारी वाहने ‘येवला–वैजापूर–गंगापूर–नेवासा–अहिल्यानगर’ या पर्यायी मार्गाने वळवावीत. पर्वणी काळात एस.टी. महामंडळाकडून दररोज ६८० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी विभाग नियंत्रकांनी दिली.
पार्किंग क्षेत्रातील कचरा उचलण्यासाठी घंटागाड्यांऐवजी ट्रॅक्टरचा वापर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. स्वच्छतेसाठी ५०० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून न राहता पाईपलाईनद्वारे पुरवठ्यावर भर देण्यात यावा. यासाठी निळवंडे कालव्यावरून पाणी उचलण्याचे नियोजन करावे. अखंडित वीजपुरवठ्यासाठी बाभळेश्वर येथून पर्यायी वीजवाहिनी टाकण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी गर्दी नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार असल्याचे सांगितले. शिर्डीच्या १५ किलोमीटर आधीपासून मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये दिशादर्शक फलक लावण्यात येतील. पार्किंगच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यासाठी डिजिटल स्क्रीन उभारण्यात येणार असून संपूर्ण परिसर सीसीटीव्ही व सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीने जोडण्यात येईल. कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष पथक व अतिरिक्त मनुष्यबळ वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कुंभमेळ्याच्या काळात मोबाईल नेटवर्क सुरळीत राहण्यासाठी १४ नवीन टॉवर्स व ५ फिरते टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. तसेच अग्निशमन सेवेसाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मागणी नाशिकच्या एकत्रित प्रस्तावात समाविष्ट करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
या बैठकीस महसूल विभाग, जिल्हा परिषद, साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपरिषद, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, शिर्डी विमानतळ प्राधिकरण, रेल्वे, एस.टी. महामंडळ व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment