आधुनिक तंत्रज्ञान शेतीसाठी उपयुक्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, महिला सक्षमीकरणातूनच शेतीचे भविष्य उज्ज्वल - पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

नेमाने इस्टेट येथे ५ ते ९ फेब्रुवारी कालावधीत कृषीपर्व महोत्सव
  घाडगे न्यूज। प्रतिनिधी 
 आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी व महिला सक्षमीकरण या माध्यमातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. त्यातूनच ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शासनाच्या योजना व बाजारपेठेच्या संधी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा ‘कृषीपर्व’ हा उपक्रम शेतीच्या परिवर्तनाचा महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कृषी विभाग, आत्मा, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर व एक्स्पो इंडियन ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेमाने इस्टेट, केडगाव रोड येथे जिल्हास्तरीय कृषी महोत्सव ‘कृषीपर्व’चा शुभारंभप्रसंगी पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, स्वामी विज्ञानानंद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उमेदचे व्यवस्थापक सोमनाथ जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री  विखे पाटील म्हणाले, कृषी क्षेत्रात सातत्याने होत असलेले बदल व नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या कृषिपर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, त्याचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. गत वर्षापेक्षा या वर्षात आठ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक शेतीक्षेत्रात करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवून शेती व शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. राज्यात २५ लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 
राहुरी येथील कृषी विद्यापीठातील जागेवर फळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली असून, हा उद्योग जिल्ह्यात आल्यास फळपीक उत्पादकांना मोठी नवसंजीवनी मिळेल. विषमुक्त शेती व दुष्काळमुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठीही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. साकळाई योजनेसाठी १ हजार ८०० कोटी रुपयांच्या निधीतून सिंचनाची कामे करण्यात येत आहेत. कुकडी कालव्याचे नूतनीकरण, प्रकल्पावरील चाऱ्यांची कामे, मुळा धरणाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ व गोदावरी नदीवरील सिंचनाची कामे वेगाने सुरू आहेत. या माध्यमातून सिंचनक्षेत्र वाढवून राज्य दुष्काळमुक्त करण्याबरोबरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने निर्णय घेत आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये ८ लाख २५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १ हजार ५२५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देत, जिल्ह्यात पुरस्कारप्राप्त शेतकरी व कृषी विद्यापीठातील विद्यार्थी यांना देशभरात कृषी क्षेत्रात होत असलेले बदल अभ्यासण्यासाठी सहलींचे आयोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले, उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यात ३० हजार ११२ बचत गट कार्यरत असून, गत तीन वर्षात या गटांना १ हजार ५०० कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. महिला बचत गटांनी स्वावलंबनाची दिशा दाखवून दिली असून त्यांच्या माध्यमातून तयार होणारी उत्पादने दर्जेदार आहेत. अशा उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळणे आवश्यक असून कृषीपर्वासारख्या प्रदर्शनांमुळे महिलांच्या उत्पादनांना ओळख मिळून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळेल.

आमदार संग्राम जगताप म्हणाले, भारत हा कृषिप्रधान देश असून अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. शासनाच्या अनेक योजनांमधून कृषी क्षेत्राला बळकटी देण्यात येत आहे. शेतीक्षेत्रात होत असलेले बदल व नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख या कृषिपर्वातून होईल. हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरेल.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. कृषी प्रक्रियेवर आधारित उद्योगाला प्राधान्य देण्याबरोबरच महिला बचत गटांनाही प्रोत्साहन देण्यात येत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले, जिल्ह्यात उमेदच्या माध्यमातून ३० हजार ११२ बचत गटांची मोठी चळवळ उभी राहिली आहे. याद्वारे ३ लाख २५ हजार महिला संघटित झाल्या आहेत. उमेद मार्टमध्ये या बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या १८० वस्तूंची नोंदणी करण्यात आली असून, या वस्तू घरबसल्या खरेदी करता येतात. १ लाख ३३ हजार महिला लखपती दीदी बनल्या आहेत. तसेच या बचत गटांना विविध व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्जाचे वितरणही केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले. 

नेमाने इस्टेट येथे ५ ते ९ फेब्रुवारी कालावधीत कृषीपर्व महोत्सव

कृषीपर्व महोत्सव केडगाव रोडवरील नेमाने इस्टेट येथे ५ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात आधुनिक कृषी अवजारे, ड्रोन तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन, सेंद्रिय शेती, कृषी प्रक्रिया उद्योग तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. पालकमंत्र्यांनी विविध स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली व महिला बचत गटांच्या उत्पादनांचे कौतुक केले. तसेच शेतकरी व उद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी महिला शेतकरी पुरस्कार, उमेद अभियानातील पुरस्कारार्थी, शासकीय रुग्णालय व क्रीडा पुरस्कार तसेच शेतकऱ्यांना विहिरींसाठीच्या अनुदानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या व्हॉट्सॲप चॅटबोटचा शुभारंभही करण्यात आला. या कार्यक्रमास शेतकरी, महिला बचत गटांच्या सदस्य, कृषी उद्योजक, कृषी तज्ज्ञ, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन