बुध्दीवानांचे राजकीय बळ लोणीत खेळ !
रविवार विशेष घाडगे न्यूज
॥ शिवाजी घाडगे ॥
राजकारण हे केवळ पदांचा खेळ नसून ते बुद्धी, व्यूहरचना आणि वेळेच्या अचूक अंदाजाचा कस लागणारे क्षेत्र आहे. शनिवारी लोणीच्या क्रीडांगणावर रंगलेल्या दोन जलसंपदा मंत्र्यांच्या बुद्धीबळ सामन्याने ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित केली. निमित्त होते जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांचे; मात्र त्याआड रंगणारा खेळ हा क्रीडेपेक्षा अधिक चर्चेचा ठरला .
राजकारणात बुध्दीचे बळ बाहु बळ
बुद्धीबळ हा ६४ घरांचा खेळ मानला जातो. मात्र या सामन्यात प्रत्येक घरात केवळ सोंगटी नव्हत्या, तर वरिष्ठांचे संकेत, संघटनात्मक गणिते आणि भविष्यातील राजकीय समीकरणेही ठेवलेली होती. कुणाच्या बाजूने प्रभावशाली पाठबळ आहे, कोणाच्या चालींना वरचा कौल लाभतो—यावरच पुढील डाव ठरत होते.
राजा, राणी, हत्ती, उंट, घोडे आणि प्यादी—अशी संपूर्ण फौज दोन्ही बाजूंनी सज्ज होती. तथापि अलीकडील निवडणूक निकालांनी एक वास्तव समोर आणले आहे की, कार्यकर्त्यांच्या बळावर उभे राहिलेले डाव टिकवण्यासाठी केवळ संख्याबळ पुरेसे ठरत नाही. त्यामुळे काही प्यादी सध्या प्रतीक्षेच्या अवस्थेत, तर काही राजकीय संदेशांच्या माध्यमातून आपले अस्तित्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
दुसरीकडे, महाजन यांनी आपल्या राजकीय हालचालींतून अनुभवाचा आणि समयसूचक निर्णयांचा प्रत्यय दिला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये घडलेल्या घडामोडींनी हे स्पष्ट केले की, राजकारणात आधी नियोजन आणि नंतर उत्सव असतो. प्रतीकात्मक यशाच्या माध्यमातून पक्षांतर्गत स्थान अधिक बळकट करण्याचा प्रयत्नही यानिमित्ताने दिसून आला.
या साऱ्या घडामोडींचा शेवट ‘चेकमेट’च्या रूपकात मांडला जात असला, तरी प्रत्यक्ष राजकारणात अंतिम डाव क्वचितच ठरतो. एखादी आघाडी, एखादं नेतृत्व किंवा एखादी व्यवस्था बाजूला पडली, म्हणून खेळ संपतोच असे नाही. सत्तेचे संतुलन सतत बदलत राहते आणि आजचा विजेता उद्याच्या आव्हानांसमोर उभा राहतो.
मुळात बुद्धीबळ हा खेळ दोन खेळाडूंमधील बौद्धिक संघर्ष असतो. मात्र राजकारणाच्या पटावर खेळाडू अधिक, सोंगट्या बदलणाऱ्या आणि डाव मागे डाव रचणाऱ्या असतात. त्यामुळे इथे ‘चेकमेट’पेक्षा ‘पुढील चाल’ अधिक महत्त्वाची ठरते—आणि तीच चाल भविष्यातील राजकीय दिशा ठरवते.♟️
Comments
Post a Comment