वैतरणाचे अतिरिक्त पाणी आता मुकणे धरणात !

वैतरणा धरणाचे अतिरिक्त पाणी आता मुकणे धरणात
घाडगे न्यूज स्पेशल रिपोर्ट
॥ शिवाजी घाडगे ॥
अप्पर वैतरणा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. मात्र दरवर्षी काही प्रमाणात अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे थेट अरबी समुद्रात वाहून जाते. हेच पाणी आता मुकणे धरणात वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे.
नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील इंजिनिअर प्रा. सतीश राऊत तसेच प्रहारचे अप्पासाहेब ढुस यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. वैतरणा बॅकवॉटरमधील अतिरिक्त पाणी उपयोगात आणल्यास नगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणांवरचा ताण कमी होईल आणि जायकवाडीला द्यावे लागणारे समन्वयी पाणी (५ टीएमसी) वाचू शकेल, असा त्यांचा ठाम आग्रह होता.
या प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्थिक मान्यता देत निधी उपलब्ध करून दिला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन 
यांचेही या निर्णयामागे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
अलीकडेच अप्पर वैतरणा व मुकणे धरण परिसराची प्रत्यक्ष पाहणी रविवारी करण्यात आली. ‘दोन भाऊ शेजारी, पण गाठ नाही’ या म्हणीप्रमाणे जवळ असूनही एक मेकाकडे पाठ करून असलेले हे दोन  ही धरणे आता प्रत्यक्ष जलवाहिनीद्वारे एक मेकांना जोडली जाणार आहेत. मातीच्या भिंतीला साडवा काढत वैतरणाचे पाणी थुईथुई करत मुकणे धरणात येण्याचे चित्र लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे.
गंगापूरवरील ताण कमी होणार
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणावर गेल्या काही वर्षांत मोठा ताण निर्माण झाला आहे. वाढती लोकसंख्या, तसेच नाशिक, निफाड, येवला, वैजापूरमार्गे संभाजीनगर व मराठवाड्याकडे जाणारा पाणीपुरवठा या सर्वांमुळे गंगापूर धरणाची क्षमता ताणली गेली होतीच. शिवाय गाळ साचल्यामुळे साठवणुकीवरही  याचा परिणाम झाला आहेच.
या पार्श्वभूमीवर अप्पर वैतरणाच्या  सांडव्याद्वारे सुमारे तीन टीएमसी पाणी मुकणे धरणात  वळविणचे काम संध्या प्रगती पथावर असून 
प्राथमिक अंदाजानुसार  वैतरणातून दरवर्षी तीन टीएमसीपेक्षा अधिक पाणी समुद्रात वाहून जाते. त्यातील काही भाग मुकणेत आल्याने अतिरिक्त जलसाठा उपलब्ध होणार आहे.
सध्या मुकणे धरणात उपलब्ध असलेले पाणी आणि नव्याने मिळणारा साठा मिळून एकूण सुमारे पाच टीएमसी पाणी उपलब्ध झाल्यास नाशिक व नगर जिल्ह्याची पाण्याची गरज  भागू शकते.
जायकवाडीला दिलासा?
नगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणासाठी द्यावे लागणारे ५ टीएमसी समन्वयी पाणी भविष्यात कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे स्थानिक सिंचनावरचा ताण कमी होईल. अतिरिक्त पाण्याचा उपयोग शेतीसाठी झाल्यास शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी थांबेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
एआय तंत्रज्ञान, आधुनिक शेती, मोठमोठ्या घोषणा यापेक्षा शेतकऱ्याला पाणी, वीज आणि पिकाला योग्य भाव मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांची परवड थांबवायची असेल तर जलव्यवस्थापनाचा ठोस निर्णय आणि शाश्वत जलधोरण हीच खरी गरज आहे. अन्यथा निवडणुकीआधी कर्जमाफीचे गाजर दाखवण्याची वेळ पुन्हा पुन्हा येत राहील.
शंभर कोटींचा प्रकल्प — भविष्यातील संघर्ष टळणार?
सुमारे शंभर कोटी रुपये खर्चून वैतरणाचे अतिरिक्त पाणी मुकणे धरणात आणण्याची योजना राबवली जात आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास मुकणे धरणाची क्षमता वाढेल, नगर जिल्ह्यावरील समन्वयी पाण्याचा ताण कमी होईल आणि भविष्यातील संभाव्य पाणीसंघर्ष टळू शकतो.
राज्य सरकारने या निर्णयातून सकारात्मक जलधोरणाची दिशा दाखवली आहे, असे म्हणता येईल. मात्र या योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि पारदर्शकता राखली गेली तरच हा प्रकल्प खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचा ठरेल  हेही तितकेच सत्य आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन