राहुरी पोलीस ठाण्यात गिते यांच्या नियुक्तीचे गित सुरुच....

राहुरी पोलिस ठाण्यात प्रल्हाद गिते यांच्या बदलीचे गित सुरुच  

चर्चा ।शिवाजी घाडगे 
राहुरी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांची सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नियुक्ती केली. मात्र ही बदली नेमकी नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे की सुरू असलेल्या चौकशीदरम्यान दिलासा, असा सवाल उपस्थित होत आहे.
राहुरीत अवघ्या आठ दिवसांपूर्वी नगरहून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना सोनई पोलीस ठाण्यातील खातेनिहाय चौकशीमुळे निलंबित करण्यात आले. त्यानंतर गिते यांची राहुरीत एंट्री झाली. परंतु गिते यांच्याविरोधातही चौकशीचे सावट असल्याने ते राहुरीत किती दिवस टिकणार, याबाबत शहरात चर्चांना उधाण आले आहे.
नगर तालुक्यातील गंभीर आरोप
नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी असताना गिते यांनी खुनाचे प्रकरण दडपल्याचा गंभीर आरोप आहे. अरणगाव (ता. अहिल्यानगर) येथील मिठू कार्तिक दत्त (वय ४२) यांना ६ मार्च २०२५ रोजी निघृण मारहाण झाली. उपचारादरम्यान २३ मार्च रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. इतक्या गंभीर घटनेनंतरही सुरुवातीला केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याने संशय अधिकच गडद झाला.
साकत येथील सोमनाथ चितळकर यांनी थेट पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणाची दखल घेण्यात आली. तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांच्या तपासात मिठू दत्त यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आणि तिघांना अटकही झाली. तपास उपअधीक्षकांकडे वर्ग करण्यात आला आहे.
मात्र प्रश्न इतक्यावर थांबत नाही. सुरुवातीला खुनाऐवजी अकस्मात मृत्यूची नोंद का? आरोपींकडून ‘चिरीमिरी’ घेतल्याचा आरोप कितपत खरा? मयताच्या नातेवाईकांना धमकावण्यात आले का? या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे, अशी नातेवाईकांची ठाम मागणी आहे.
दुहेरी मापदंड?
दरम्यान, सुपा पोलीस ठाण्यातील एमआयडीसी परिसरात मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तात्काळ निलंबित केले होते.
मग नगर तालुक्यातील गंभीर प्रकरणात चौकशी सुरू असताना गिते यांची राहुरीसारख्या ‘ए-ग्रेड’ पोलीस ठाण्यात बदली का? हा दुहेरी निकष नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
राहुरीतील समीकरणे जुळणार?
राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि गिते यांचे सुत जुळेल का, याचीही चर्चा रंगली आहे. नगर तालुक्यात गिते यांचा दबदबा आणि ‘उठबस’ परिचित होती. अनेक जण त्यांच्या दिमतीला असत, अशी चर्चा आहे. राहुरीचा ‘राहू’ गितेंना साथ देणार की ग्रहण लावणार, हे येणारा काळ ठरवेल.
दरम्यान, राहुरीत हेल्मेट कारवाई जोरात सुरू असताना गिते यांना रस्त्यावर उतरवले जाणार असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे.
एखादे प्रकरण चुकीच्या पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न झाला असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा “निलंबन एका ठिकाणी आणि बदली दुसऱ्या ठिकाणी” हा संदेश पोलीस यंत्रणेच्या विश्वासार्हतेला तडा देणारा ठरेल.
राहुरीतील ही बदली केवळ प्रशासकीय आहे की तपासाच्या भोवऱ्यातील अधिकाऱ्याला सुरक्षित किनारा? उत्तर प्रशासनालाच द्यावे लागेल हे मात्र नक्की. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन