महात्मा फुले भाजीपाला संशोधन केंद्राला पुरस्कार
घाडगे न्यूज।प्रतिनिधी
भाजीपाला संशोधन संस्थेची 44 वी वार्षिक गट बैठक श्री कोंडा लक्ष्मण तेलंगणा राज्य फलोत्पादन विद्यापीठ, हैदराबाद येथे पार पडली. याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठतील उद्यान विद्या विभागांतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वित भाजीपाला पिके संशोधन प्रकल्पास उत्कृष्ट केंद्र पुरस्कार- 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्यानविद्या विभाग प्रमुख तथा वरिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉ. बी. टी. पाटील, कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉ. शर्मिला शिंदे, कनिष्ठ रोगशास्त्रज्ञ प्रा. चिमाजी बाचकर, कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. शालिग्राम गांगुर्डे यांनी मान्यवरांच्या हस्ते सदरचा पुरस्कार स्वीकारला. हैदराबाद मधील राजेंद्रनगर येथील फलोत्पादन महाविद्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीप्रसंगी तेलंगणा उद्यानविद्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीजी रेड्डी, तेलंगणा राज्याचे सचिव सुरेश कुमार मोहन, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथील सहाय्यक महासंचालक (फळ व भाजीपाला पिके) डॉ. सुधाकर पांडे, तेलंगण उद्यानविद्या विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. लक्ष्मी नारायण व इतर मान्यवर उपस्थित होते.
कृषी विद्यापीठ राहुरी येथील भाजीपाला संशोधन प्रकल्पाच्या स्थापनेपासून आजपर्यंत 40 हून अधिक भाजीपाला पिकांचे सुधारित व संकरित वाण विकसित करण्यात आली असून त्यापैकी अनेक वाणांना केंद्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. विविध भाजीपाला पिकांबाबत शेतकरी हिताच्या महत्त्वपूर्ण १२० शिफारशी प्रसारित करण्यात आल्या आहेत तसेच अनेक संशोधनात्मक लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकांच्या 15 वाणांची पी.पी.व्ही. एफ. आर. ए. मध्ये नोंदणी करण्यात आली आहे. याशिवाय 25 पेक्षा अधिक जणूकांचे एन. बी. पी. जी. आर., नवी दिल्ली येथे जतन करण्यात आले आहे. एकंदरीत मागील पाच वर्षाच्या भाजीपाला प्रकल्पाच्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर या प्रकल्पास उत्कृष्ट संशोधन केंद्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे,संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉ.साताप्पा खरबडे यांनी भाजीपाला प्रकल्पातील सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी ज्यांचे यामध्ये मोलाचे योगदान लाभले त्या सर्वांचे या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment