महात्मा फुले कृषी विद्यापीठात डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर संभागृह
घाडगे न्यूज ॥शिवाजी घाडगे ॥
महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुसज्ज सभागृह उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन बुधवारी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. आंबेडकर यांचे नावाचे संभागृह या विद्यापीठाला लाभण्यासाठी तब्बल ५८ वर्षे प्रतीक्षा करावी लागली, ही बाब खेदजनकच म्हणावी लागेल. महात्मा फुले यांना आदर्श मानणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करण्यास एवढा विलंब का झाला, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. उशिरा का होईना, हा निर्णय झाला; मात्र तो अधिक आधी व्हायला हवा होता, हेही तितकेच सत्य आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानसभेच्या प्रचारसभेदरम्यान या परिसरात फळ प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. फळांपासून ज्यूससारखी उत्पादने तयार केल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकतो आणि स्थानिक अर्थचक्रालाही चालना मिळू शकते. त्यामुळे विद्यापीठाच्या मालकीचा फळ प्रक्रिया उद्योग उभारण्याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. अन्यथा, विद्यापीठाच्या जमिनीवर खासगी उद्योगपतींची नजर असल्याच्या चर्चांना खतपाणी मिळेल.
विद्यापीठाची जमीन ही शेतकऱ्यांकडून संशोधन व शैक्षणिक कार्यासाठी संपादित करण्यात आलेली आहे. त्यामुळे तिचा उपयोग केवळ शेती संशोधन, शिक्षण आणि विस्तार कार्यासाठीच व्हायला हवा. दुर्दैवाने, गेल्या काही वर्षांत संशोधनापेक्षा राजकारण अधिक सक्रिय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रशासकीय इमारतीतच मर्यादित राहणारी यंत्रणा प्रत्यक्ष प्रकल्प क्षेत्रात सक्रिय होणे आवश्यक आहे.
विद्यापीठ प्रक्षेत्रावर भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना “हेच खरे कृषी संशोधनाचे केंद्र” असल्याचा आत्मविश्वास वाटला पाहिजे. यासाठी कुलगुरू विलास खर्चे यांनी ठोस आणि परिणामकारक पावले उचलणे अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षांत विद्यापीठाच्या कारभारात आलेली शिथिलता आणि दिखाऊपणा थांबवून कार्यक्षमतेकडे वाटचाल करणे काळाची गरज आहे.
डॉ. आंबेडकरांच्या नावाने उभारलेले सभागृह हे केवळ नामफलकापुरते मर्यादित न राहता त्यांच्या विचारांना आणि तत्त्वांना न्याय देणारे ठरावे, हीच खरी अपेक्षा.
Comments
Post a Comment