विमान आपघात धुकं की धोका

धुकं की धोकं? सत्याच्या शोधात राजकारणाची सावली
चर्चा घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे 
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी भेट घेत या अपघाताच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केले. “अपघात धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे?” हा राज ठाकरे यांचा सवाल केवळ शब्दांचा खेळ नाही; तो शासनाच्या पारदर्शकतेवर थेट बोट ठेवणारा आहे.
अपघात ही केवळ एक दुर्दैवी घटना नसते. ती प्रशासन, सुरक्षा व्यवस्था, तांत्रिक दक्षता आणि जबाबदारी यांच्या साखळीची कसोटी असते. अशा वेळी जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. ते प्रश्न दाबून टाकणे हा उपाय नसतो; उलट त्यांना स्पष्ट उत्तर देणे हीच लोकशाहीची खरी ताकद असते.
रोहित पवार यांनी एफ आय आर नोंदवण्याची आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. मागणी चुकीची नाही. परंतु प्रश्न असा आहे की या मागणीमागे केवळ सत्याचा शोध आहे की राजकीय गणितांचे सावट? कारण गेल्या काही दिवसांत या विषयाभोवती ज्या प्रकारे आरोप-प्रत्यारोपांची धुरळा उडवली जात आहे, त्यातून ‘सत्य’पेक्षा ‘राजकीय भूमिका’ अधिक ठळक दिसू लागली आहे.
विरोधक म्हणतात हा विषय पुढे करून राजकीय पुनर्स्थापनेचा डाव रचला जातो आहे. समर्थक म्हणतात सत्य बाहेर यावे, एवढीच अपेक्षा. दोन्ही बाजूंनी शब्दांची तोफ धडाडते आहे. पण या सगळ्या गदारोळात एक मूलभूत प्रश्न हरवतो आहे—दिवंगत नेत्याच्या अपघाताचे वस्तुनिष्ठ सत्य नेमके काय?
एखाद्या दुर्घटनेचा तपास हा भावनांच्या भरात नव्हे तर पुराव्यांच्या आधारावर व्हायला हवा. धुकं असेल तर त्याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण द्यावे. तांत्रिक बिघाड असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करावी. आणि जर कुठे निष्काळजीपणा किंवा अन्य काही कारण आढळले, तर ते निर्भीडपणे जनतेसमोर मांडावे. अर्धवट माहिती आणि सूचक विधानांनी संशय अधिक गडद होतो.
“महाराष्ट्र बघतो आहे” हा नारा केवळ राजकीय संवाद नसून तो सत्ताधाऱ्यांसाठी इशाराही आहे. कारण लोकशाहीत विश्वास हा सर्वात मोठा भांडवल असतो. तो डळमळीत झाला, तर सत्तेची इमारत कितीही भक्कम असली तरी तडे जातात.
आज गरज आहे ती राजकारणाच्या धुक्याआडून बाहेर पडण्याची. तपास पारदर्शक, वेळबद्ध आणि निष्पक्ष व्हायला हवा. अपघात धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे—हा प्रश्न राजकीय सभांमध्ये नव्हे, तर अधिकृत अहवालात स्पष्ट व्हायला हवा.
कारण अखेर जनतेला राजकीय कोडी नकोत; तिला सत्य हवे आहे. आणि सत्य जितके उशिरा येईल, तितके धुकं अधिक दाट होत जाईल.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन