राहुरीची पोट निवडणूक उमेदवार नाही दिशा ठरवणारी लढाई
स्पेशल रिपोर्ट घाडगे न्यूज
॥ शिवाजी घाडगे ॥
राहुरीची संभाव्य पोटनिवडणूक ही केवळ एका रिक्त आमदारकीसाठीची लढाई राहिलेली नाही. ती आता तालुक्याच्या राजकीय दिशेचा, पक्षीय समीकरणांचा आणि नेतृत्वाच्या अस्तित्वाचा कौल ठरणार आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनाने निर्माण झालेली ही राजकीय पोकळी अनेकांसाठी संधी आहे, तर काहींसाठी अस्तित्वाची परीक्षा.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे : “वेट अँड वॉच” की “हाय रिस्क डिसिजन”?
प्राजक्त तनपुरे यांची आजची भूमिका अलर्ट आहे, पण ती निष्क्रिय नाही.
त्यांच्याकडे तीन स्पष्ट पर्याय दिसतात—
राष्ट्रवादीत राहून दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची वाट पाहणे
स्वतंत्र निर्णय घेऊन नव्या राजकीय वळणाकडे जाणे
हिंदुत्वाच्या मुद्द्याशी थेट किंवा अप्रत्यक्ष जुळवून घेणे
गळ्यात दिसणारे भगवे उपरणे ही केवळ प्रतिकात्मक बाब नाही. ती राजकीय चाचपणी आहे—जनमत कुठे झुकतेय, हे पाहण्याची. राहुरीत हिंदुत्वाचा मुद्दा निवडणूक जिंकवू शकतो, हे शिवाजी कर्डीले यांच्या विजयाने आधीच सिद्ध झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस : राहुरीत ताकद, पण दिशाहीनता?
राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद राहुरीत आजही आहे, मात्र नेतृत्वाची एकवाक्यता नाही.
शरद पवार विरुद्ध अजित पवार या संघर्षात तळागाळातील कार्यकर्ता संभ्रमात आहे. अशा स्थितीत प्राजक्त तनपुरे यांना स्पष्ट, जलद आणि धाडसी निर्णय घ्यावा लागणार आहे. उशीर झाला, तर राजकीय अवकाश दुसरेच भरून काढतील.
भाजप : सहानुभूती + संघटन = मजबूत दावेदारी
दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्याविषयी सहानुभूतीचा लाट अजूनही ताजी आहे. भाजप ही सहानुभूती संघटनशक्ती आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याशी जोडण्याचा प्रयत्न करेल. योग्य उमेदवार दिल्यास भाजपसाठी राहुरी पुन्हा जिंकणे अवघड नाही, हे वास्तव नाकारता येत नाही.
“दादा फॅक्टर” : राहुरीचा कायमस्वरूपी राजकीय स्वभाव
राहुरीच्या राजकारणात एक गोष्ट सातत्याने दिसते—
नेत्याचे नाव बदलते, पक्ष बदलतो, पण ‘दादा’ हाच ब्रँड टिकून राहतो.
लोकांना केवळ आमदार नको, तर हक्काने फोन उचलणारा, गावोगाव फिरणारा, शब्द पाळणारा “दादा” हवा आहे.
म्हणूनच प्रश्न हा नाही की आमदार कोण?
प्रश्न हा आहे की—लोकांचा “दादा” कोण ठरणार?
डाॅक्टर सुजय दादा, अक्षय दादा की प्राजक्त दादा?
डॉ. सुजय विखे पाटील : विकास आणि प्रशासकीय पकड
अक्षय दादा : तरुण चेहरा आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व
प्राजक्त तनपुरे : परंपरा, अनुभव आणि भावनिक नाळ
ही लढाई तिघांपैकी कोण जिंकणार याची नसून, राहुरी कोणत्या विचारधारेला कौल देणार याची आहे.
राहुरीची पोटनिवडणूक ही जनतेचा मूड, पक्षांची दिशा आणि नेतृत्वाचा कस एकाच वेळी लावणारी आहे.
जो निर्णय वेळेत, ठाम आणि लोकभावनेशी जोडलेला असेल—
तोच “दादा” राहुरीचा आमदार होईल.
Comments
Post a Comment