आधी महामार्ग चे काम पूर्ण होऊ द्या मग पाहू.....डाॅक्टर सुजय विखे-पाटील

आधी महामार्ग काम पूर्ण होऊ द्या, मग पाहू… – माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांची ठाम भूमिका
घाडगे न्यूज । प्रतिनिधी
राहुरी —
नगर–मनमाड राज्य महामार्गाच्या रखडलेल्या कामास गती देण्यासाठी राहुरी येथे आयोजित बैठकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी स्पष्ट व रोखठोक भूमिका घेतली. “आधी महामार्गाचे काम पूर्ण होऊ द्या, त्यानंतर पुढील सर्व प्रश्न सोडवू,” असा ठाम संदेश त्यांनी प्रशासन, ठेकेदार आणि नागरिकांना दिला.
“आम्ही कधीही पदाचा अहंकार बाळगलेला नाही. जनतेसाठी काम करताना सरळ, स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका घेतली पाहिजे,” असे सांगत डॉ. विखे यांनी कामात गोड बोलण्यापेक्षा थेटपणा आणि जबाबदारी महत्त्वाची असल्याचे ठणकावून सांगितले.
नगर–मनमाड महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर–मनमाड महामार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून २० फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी व प्रवाशांनी संयम व सहकार्य ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.
महामार्गालगत बंदिस्त साईड गटारापासून चार मीटरपर्यंत असलेली अतिक्रमणे संबंधित व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून हटवावीत, अन्यथा प्रशासनामार्फत कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.
व्यापाऱ्यांच्या तक्रारींवर थेट चर्चा
राहुरी शहर हद्दीत साईड गटाराचे काम सुरू असून गटारी रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच झाल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी व्यापाऱ्यांनी मांडल्या. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर चित्रमंदिर येथे आयोजित बैठकीत नागरिक व व्यापाऱ्यांनी आपापल्या अडचणी मोकळेपणाने मांडल्या.
“थोडा त्रास सहन करा, प्रश्न कायमचा सुटेल”
काम पूर्ण होईपर्यंत काही काळ गैरसोय होणार असली, तरी त्यानंतर नगर–मनमाड महामार्गाचा प्रश्न कायमचा सुटेल, असा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला. विकासकामांना अडथळे न आणता सर्वांनी अतिक्रमणे काढून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
समस्या ऐकून जागेवरच आदेश
बैठकीत पाणी निचरा, रस्त्याची उंची, दुकानांपर्यंत पोहोच आणि वाहतुकीसंदर्भातील प्रश्न उपस्थित झाले. या सर्व समस्यांची गंभीर दखल घेत डॉ. सुजय विखे-पाटील यांनी ठेकेदार व प्रशासनाला जागेवरच स्पष्ट आदेश दिले. गैरसमज दूर करून कामाला तातडीने गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
चौकट
समस्या सोडवणे हाच उद्देश
अनेक तांत्रिक अडचणी असूनही महामार्गाचे काम सुरू आहे. आंदोलन किंवा वाद न करता सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करणे आवश्यक आहे. श्रेय कुणीही घ्यावे, मात्र काम वेळेत पूर्ण होणेच महत्त्वाचे आहे. पुढील एका महिन्यात शहरातील काम पूर्ण करण्याचा निर्धार डॉ. विखे यांनी व्यक्त केला.
चौकट
“मी पदाचा नव्हे, कामाचा माणूस आहे”
“मी माजी खासदार असलो तरी अनावश्यक गोंधळ निर्माण करू नका. रखडलेली व वाढीव रस्त्यांची कामे वरिष्ठ पातळीवरून मंजूर करून आणण्याची जबाबदारी माझी आहे. ठेकेदाराला अडथळे आले, तर काम थांबेल आणि त्याची किंमत आपल्यालाच मोजावी लागेल. भविष्यातील पिढी आपल्याला दोष देऊ नये, यासाठी हे काम पूर्ण होऊ द्या,” असा ठाम संदेश डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिला.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन