कॅमेऱ्यासमोर रडताना...हसताना..

कॅमेऱ्यासमोर रडताना... हसताना.. 
संवेदना ॥शिवाजी घाडगे ॥
राजकारण म्हणजे केवळ सत्ता, पद आणि समीकरणांचा खेळ नाही; ते समाजजीवनाचे प्रतिबिंब असते. पण अलीकडील घडामोडी पाहताना एक अस्वस्थ करणारा प्रश्न पुन्हा पुन्हा डोके वर काढतो — राजकारणात प्रवेश करताच माणूस बदलतो का, की सत्तेच्या स्पर्धेत त्याच्या संवेदनाच हरवतात?
सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्यांकडून समाज अपेक्षा ठेवतो ती केवळ निर्णयक्षमतेची नाही, तर संवेदनशीलतेचीही. कारण ते फक्त पक्षाचे प्रतिनिधी नसतात, तर समाजाच्या भावविश्वाचेही प्रतिनिधित्व करीत असतात. मात्र अनेकदा दुःखाचे प्रसंगही राजकीय रंगमंचावर ‘इव्हेंट’ ठरतात. कॅमेऱ्यासमोर उमटणारे अश्रू आणि कॅमेऱ्यामागे सुरू होणारी राजकीय रणनीती — या दोन टोकांमधील दरीच आज सर्वाधिक अस्वस्थ करते.
“राजकारणात कोण कुणाचं नसतं,” ही म्हण आपण वारंवार ऐकतो. परंतु ही वस्तुस्थिती म्हणून स्वीकारताना आपण माणुसकीलाही गहाण ठेवायचं का? मतभेद असू शकतात, राजकीय भूमिका भिन्न असू शकतात; पण दुःख, आपुलकी आणि संवेदना या मूल्यांना तरी पक्षरेषा नसाव्यात. अन्यथा राजकारण हे समाजघटकांना जोडण्याऐवजी अधिक दुरावणारे ठरते.
आजच्या राजकीय संस्कृतीत समीकरणांचे गणित प्राधान्याने मांडले जाते; परंतु भावनिक प्रामाणिकतेचे गणित मात्र कोणी मांडताना दिसत नाही. सत्ता मिळवणे, आघाड्या करणे किंवा भूमिका बदलणे ही राजकारणाची वास्तवता असू शकते; पण त्या प्रक्रियेत मानवी मूल्ये हरवली, तर लोकशाहीचा आत्माच दुर्बल होतो.
खरी गरज राजकारण बदलण्याची नाही, तर राजकारणात वावरणाऱ्या माणसांच्या मनातील माणुसकी जागवण्याची आहे. कारण सत्ता क्षणभंगुर असते; परंतु संवेदना टिकवणारा नेता समाजाच्या स्मरणात दीर्घकाळ राहतो.
राजकारण जर मूल्याधिष्ठित असेल, तर ते समाजाला दिशा देते. पण संवेदनाहीन राजकारण समाजात अविश्वास निर्माण करते. म्हणूनच आजचा मूलभूत प्रश्न सत्ता कोणाकडे आहे हा नसून, संवेदना कोण जपतो हा आहे.
दादा” गेले म्हणून अश्रूंचा पूर आणणारे…आज त्याच चेहऱ्यांवर हास्य, चहाचे कप, गप्पा,रणनीती…हीच का ती नाती?हीच का ती आपुलकी?हीच का संवेदना, हेच का दुःख..दादांचे शब्द राजकारण लय वंगाळ असतं हेच आज खरं आहे..!
माणुस गेल्यावर अतिम संस्कार करून आल्यावर हाॅटेल मधून भाज्या अण रोट्यावर ताव मारला जातो आज कुणाला कुणासाठी रडायला व थांबायला वेळ नाही. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन