कृषीपर्व कृषी प्रदर्शन ५ ते ९ अहिल्यानगर मध्ये

‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव ५ ते ९ फेब्रुवारीला अहिल्यानगर मध्ये 
घाडगे न्यूज | प्रतिनिधी
कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद अहिल्यानगर व एक्सपो इंडियन ओशियन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत केडगाव रोडवरील नेमाने इस्टेट येथे भव्य जिल्हा कृषी महोत्सव ‘कृषीपर्व’ तसेच कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे, कृषी उत्पादनांचे प्रदर्शन करणे तसेच थेट खरेदी-विक्रीची संधी उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.
या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
महोत्सवात धान्य महोत्सव, खाद्य महोत्सव, कृषी प्रक्रिया उद्योगांचे प्रदर्शन, महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने, कृषी यांत्रिकीकरण व निविष्ठांचे सुमारे ५०० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये जामखेडची ज्वारी, अकोलेचा सुवासिक इंद्रायणी तांदूळ, हातसडीचा तांदूळ, गावरान मटकी, गहू, कडधान्ये, फळे व भाजीपाला तसेच विविध कृषी प्रक्रिया पदार्थांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे.
कृषी क्षेत्रातील आधुनिक बदल लक्षात घेऊन या महोत्सवात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आधारित उपाययोजना तसेच काटेकोर शेतीविषयी माहिती देणारे विशेष स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यासोबतच खाद्य महोत्सवाच्या माध्यमातून शिपी आमटी, शिंगोरी आमटी, मांडे, थालपीठ यांसह विविध पारंपरिक गावरान खाद्यपदार्थांचा आस्वाद नागरिकांना घेता येणार आहे.
महोत्सवाच्या कालावधीत आयोजित कृषी परिषदेअंतर्गत कृषी विभागाशी संबंधित अधिकारी व विषयतज्ज्ञांच्या उपस्थितीत मार्गदर्शनपर चर्चासत्रे व व्याख्याने होणार असून, त्यातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादनवाढ, कृषी प्रक्रिया उद्योग तसेच बाजारपेठ व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट, कृषी उद्योजक, विद्यार्थी व नागरिकांनी या जिल्हा कृषी महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन