देवळाली प्रवरा येथील सत्यजित मुसमाडे यांची इस्त्रो मध्ये निवड
देवळाली प्रवरातील सत्यजित मुसमाडे यांची इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून निवड
देवळाली प्रवरा येथील रहिवासी सत्यजित कृष्णराव मुसमाडे यांची
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
(इस्रो) मध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे देवळाली प्रवरा परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वैज्ञानिक होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता नव्हे, तर सातत्यपूर्ण परिश्रम, चिकाटी आणि ध्येयवेडी वृत्ती आवश्यक असते. सत्यजित यांनी या सर्व गुणांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाल्याने देवळाली प्रवरा येथून इस्रोमध्ये दाखल होणारे ते पहिले युवक ठरले आहेत, ही बाब परिसरासाठी अभिमानास्पद आहे.
सत्यजित हे डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक कृष्णराव नानासाहेब मुसमाडे यांचे सुपुत्र होत. आजोबा आणि वडिलांकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा त्यांनी शिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून देशसेवेत रूपांतरित करण्याचा संकल्प केला आहे.
त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देवळाली प्रवरा येथील डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. दहावीनंतर त्यांनी जेईई अॅडव्हान्स ही कठीण स्पर्धा परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांना भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था
येथे प्रवेश मिळाला. तेथे शिक्षण घेत असताना कॅम्पस मुलाखतीत त्यांची थेट इस्रोमध्ये निवड झाली.
कधी कधी जनतेच्या दरबारात प्रत्येकाला न्याय मिळेलच असे नसते; परंतु शिक्षणातून मिळवलेले ज्ञान, कष्टातून घडवलेली गुणवत्ता आणि वैज्ञानिक पदवी ही आयुष्यभर व्यक्तीच्या यशाचा तुरा बनून गावाच्या वैभवात भर घालत असते. सत्यजित यांनी घेतलेली अथक मेहनत आणि जिद्द भविष्यात देशासाठी महत्त्वपूर्ण कार्य घडवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
देवळाली प्रवरासाठी हा केवळ वैयक्तिक यशाचा क्षण नसून संपूर्ण परिसराच्या अभिमानाचा आणि प्रेरणेचा सोहळा ठरला आहे.
Comments
Post a Comment