राज्यसंभेवर महाराष्ट्राचे खासदार जाणार सात
रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे
महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित निर्णयांची परंपरा नवीन नाही. अनेकदा शेवटच्या क्षणी घेतलेले राजकीय निर्णय केवळ सत्तेचे गणित बदलत नाहीत, तर राजकारणाच्या प्रवाहालाही नवी दिशा देतात. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय त्याच प्रकारचा मानला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे ज्योती वाघमारे यांच्या सारख्या लढवय्या महिलेला संसदेत पाठवून शिवसेना सर्वसामान्य सैनिक न्याय देते हा विश्वास कायम ठेवून ज्योत से ज्योत जलाके चलो म्हणत अंधार दुर करण्याचा प्रयत्न करत शिवसेना प्रस्थापित पुढाऱ्यांचा पक्ष नसल्याचे सिध्द करत एका बानात अनेकांना घायाळ केले
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी सात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. भाजपचे चार, शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन असे सात उमेदवार राज्यसभेवर जाणार आहेत. भाजपकडून विनोद तावडे, रामराव वडकुते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माया इवनाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा संधी मिळत असून अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांचे नाव पुढे आले आहे.
मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती शिवसेनेच्या एका जागेची. या जागेसाठी अनेक अनुभवी नेत्यांची नावे चर्चेत होती. राहुल शेवाळे, रोहित टिळक किंवा शायना एन.सी. यांसारख्या नेत्यांची नावे पुढे येत होती. विशेषतः लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू रोहित टिळक यांचीही चर्चा होती. त्यामुळे अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
पण शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी सोलापूरच्या ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देत सगळ्यांचेच अंदाज चुकवले. हा निर्णय अनेकांच्या दृष्टीने ‘धक्कातंत्र’ वाटत असला, तरी त्यामागे एक सामाजिक संदेश दडलेला असल्याचेही अनेकांचे मत आहे.
राजकारणात राज्यसभा ही प्रामुख्याने दीर्घकाळ पक्षासाठी काम केलेल्या ज्येष्ठ नेत्यांना दिली जाणारी संधी मानली जाते. त्यामुळे अनुभवी नेत्यांना वगळून नवख्या चेहऱ्याला संधी देणे हा धाडसी निर्णय ठरतो. शिवसेनेने बहुजन समाजातील आणि सामाजिक चळवळींतून पुढे आलेल्या महिलेला राज्यसभेची संधी देत वेगळा संदेश दिल्याचे चित्र दिसते.
ज्योती वाघमारे या आंबेडकरी चळवळीतील आक्रमक आणि स्पष्टवक्त्या चेहरा म्हणून ओळखल्या जातात. अत्यंत साध्या कुटुंबातून पुढे येत त्यांनी सामाजिक चळवळी, मानवी हक्क अभियान आणि सांस्कृतिक आंदोलनांत सक्रिय भूमिका बजावली आहे. प्रभावी वक्तृत्व आणि शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे त्या गेल्या काही वर्षांत राजकारणात चर्चेत राहिल्या आहेत.
शिवसेनेत २०२२ मध्ये पडलेल्या फुटीनंतर शिंदे गटासमोर नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याचे मोठे आव्हान होते. त्या काळात महिला नेतृत्वाची पोकळी स्पष्टपणे जाणवत होती. वाघमारे यांनी पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून आक्रमक भूमिका घेत ही पोकळी काही प्रमाणात भरून काढली. त्यामुळे त्यांना राज्यसभेची संधी देणे हे केवळ राजकीय समीकरण नसून नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न मानला जात आहे.
अर्थात, या निर्णयामुळे पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असणे स्वाभाविक आहे. अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्यांना अशी संधी मिळावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची असते. परंतु राजकारणात प्रत्येक निर्णय हा केवळ अनुभवावरच आधारित नसतो; तो प्रतिमेचा, संदेशाचा आणि भविष्यातील राजकीय रणनीतीचाही भाग असतो.
आजचा प्रश्न असा आहे की, हा निर्णय केवळ राजकीय धक्का म्हणूनच लक्षात राहणार का, की तो सामाजिक प्रतिनिधित्वाच्या नव्या राजकारणाची सुरुवात ठरणार? महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा छोटे निर्णय मोठे परिणाम घडवून आणतात. ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारीकडेही अशाच दृष्टीने पाहण्याची गरज आहे.
राजकारणात धक्कातंत्र हे नवे नाही; परंतु त्या धक्कातून जर नवे नेतृत्व आणि व्यापक सामाजिक प्रतिनिधित्व पुढे येत असेल, तर त्याला केवळ राजकीय खेळी म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. येणारा काळच ठरवेल की हा निर्णय क्षणिक ठरतो की राजकारणात नवा अध्याय लिहितो.
Comments
Post a Comment