देवळालीत वाढीव पाणी पट्टी रद्द करा

देवळाली प्रवरा नगरपालिकेची 
वाढीव पाणीपट्टी रद्द करण्यासाठी  सर्वपक्षीय धरणे आंदोलन
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी देवळाली प्रवरा नगरपालिकेसमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी विद्यमान नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. बहुमताच्या जोरावर नगराध्यक्ष शहरावर हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
वाढीव पाणीपट्टीचा निर्णय रद्द केल्यास तुमचा अपमान होणार नाही, उलट जनतेत मान वाढेल, असे आंदोलकांनी नगराध्यक्षांना उद्देशून सांगितले. या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती आणि अनेक महिलांनी आपले विचारही व्यक्त केले.
विद्यमान नगरसेविका सुनीता थोरात यांनी सांगितले की, “आम्ही सत्तेसोबत नाही तर जनतेसोबत आहोत. देवळाली प्रवरा नगरपालिकेत पाणीपट्टी वाढविण्याच्या निर्णयाला आम्ही सुरुवातीपासून विरोध केला होता. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे, नागरिकांचे उत्पन्न घटले आहे. अशा वेळी ही वाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. विरोधकांना बोलू दिले जात नाही, नगराध्यक्ष मनमानी करत आहेत. पालिकेसाठी निधी आणता येत नसेल तर आम्ही आणू. जनतेच्या मताची कदर ठेवावी. ज्यांनी तुम्हाला सत्ता दिली त्यांनाच पाणीपट्टी वाढवून धक्का देऊ नका.”
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संतोष चोळके यांनी जिल्ह्यातील इतर नगरपालिकांच्या पाणीपट्टीचा आणि देवळाली नगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या वाढीचा तफावत दाखविणारा तक्ता सादर केला. “शहरातील रस्ते खराब आहेत, सार्वजनिक शौचालये, पाणीपुरवठा आणि भुयारी गटार योजनेचे काय झाले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासक काळात नगराध्यक्षांचा हस्तक्षेप होता आणि मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गटनेते तथा नगरसेवक दासू पटारे यांनी भाजपच्या विद्यमान नगरसेवकांनी श्रीरामपूर नगरपालिकेतील नगरसेवकांचा आदर्श घ्यावा, अशी खोचक टीका केली. “नगराध्यक्षांची मनमानी चालू देणार नाही. चांगल्या कामांना पाठिंबा देऊ, मात्र जनविरोधी निर्णयांना विरोध करू,” असे ते म्हणाले.
प्रहार संघटनेचे अप्पासाहेब ढुस यांनी पाणीपट्टी ३ हजार ते ११ हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव असल्याचा आरोप केला. “पहिल्याच बैठकीत नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले. खोटा ठराव लिहून इतकी मोठी वाढ केली जात आहे, जी नागरिकांना परवडणारी नाही,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे पाणीपुरवठ्याबाबतही प्रश्न उपस्थित केले. “नगरपालिकेकडे २८ लाख लिटर पाणी उपलब्ध असून ६१ लाख लिटर उचल दाखविली जाते. अतिरिक्त ३३ लाख लिटर पाणी कुठे जाते? अनधिकृत नळ कनेक्शन शोधून काढावीत. ९१ लाख रुपयांचे वीजबिल का येते? सौरऊर्जा प्रकल्प उभारावा. दीड कोटी रुपयांचे डिपॉझिट कुठे गेले?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
शिवसेनेचे दत्तात्रय कडू यांनी प्रशासकीय मंडळाने पाणीपट्टी वाढीचा ठराव कायम न केल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली. कॉम्रेड मदिना शेख यांनी शहरातील वाड्या-वस्त्यांवर मूलभूत सुविधांचा अभाव असताना पाणीपट्टी वाढविणे चुकीचे असल्याचा आरोप केला.
काँग्रेस नेते तथा तनपुरे साखर कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे यांनीही
आपण स्वतंत्र भारतात राहतो मात्र येथे आजुन पारतंत्र्य आहे नगराध्यक्ष दहशतीत कारभार हाकत असून 
 पाणीपट्टी वाढीचा निषेध करत केंद्र आणि राज्यात सत्ताधारी पक्षाची सत्ता असताना नागरिकांवर करांचा बोजा टाकू नये, असे सांगितले. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष यांनी नवीन पाईपलाईन मंजूर न करता पाणीपट्टी वाढविणे हे गोरगरिबांसाठी अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले. नगसेवक शरद वाळुज, पल्लवी ढुस, दिपक त्रिभुवन, विजय कुमावत, भाऊसाहेब गुजाळ, राजेंद्र लांडगे, 
वैभव गिरमे, नानासाहेब कदम, अनिल चव्हाण, बाळासाहेब खादे, भगवान गडाख,अध्य प्रशांत काळे, अनिल चव्हाण, प्रकाश सोनी, किशोर कोबरने, बाळासाहेब खुरूद,  बाळासाहेब पडागळे, बंटी लोंढे, नानासाहेब उंडे, मदिना शेख, तैनूर पठाण, वसंत कदम,  संजय मुसमाडे, आदी सह 
या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड कुमार भिगारदे यांनी केले. आंदोलनानंतर मुख्याधिकारी ऋषीकेश  पाटील यांना निवेदन देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन