पोलीस दादा करत आहेत वन्यजीवांचे संरक्षण चांदबीबी महाल वर स्वच्छतादूताची भूमिका
घाडगे न्यूज।प्रतिनिधी
अहिल्यानगर पोलिसांच्या अंतर्गत चांदबीबी महाल परिसरात दळण वळण माहीती तंत्रज्ञान वायरलेस रिपीटर स्टेशन बसविण्यात आले असून येथे पोलीस कर्मचारी सागर दाणी कार्यरत आहेत. मात्र ते केवळ आपल्या कर्तव्यापुरते मर्यादित न राहता, वन्यजीव संरक्षण आणि परिसर स्वच्छतेसाठीही उल्लेखनीय काम करत आहेत.
सागर दाणी हे रात्रंदिवस या ठिकाणी तैनात असतात. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत ते वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करून त्यांची देखभाल करतात. या पाणवठ्यांवर विविध वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. आपल्या अनुभवाबद्दल सांगताना दाणी म्हणाले, “बिबट्याला अत्यंत तीव्र संवेदना असते. एकदा माझ्या समोर बिबट्या आला होता. पाणवठे स्वच्छ करताना त्याच्या विष्ठेची साफसफाईही करावी लागते. त्या वेळी त्याचा वास हाताला येतो, पण हे काम वन्यजीवांसाठी आवश्यक असल्याने मी ते मनापासून करतो.”
या परिसरात विविध प्रकारचे सर्पही आढळतात. सागर दाणी यांनी सर्पमित्रांकडून प्रशिक्षण घेऊन साप पकडण्याचे कौशल्य आत्मसात केले असून, गरज भासल्यास ते सुरक्षितपणे सर्पांना पकडून त्यांचे पुनर्वसन करतात.
चांदबीबी महाल परिसरात नेहमीच पर्यटकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी दाणी सामाजिक संस्थांच्या मदतीने स्वच्छता उपक्रम राबवतात. एक पोलीस कर्मचारी आपल्या नियमित कामाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसून येते.
सागर दाणी यांचे हे कार्य नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
विषेश म्हणजे येथे आपली जीवन यात्रा संपवयला आलेल्या सात जणांना त्यानी समुपदेशन करत जीव वाचवले आहेत
केवळ काम करता करता या परिसरिचा चेहरा मोहरा सागर दाणी यांनी बदलला या बद्दल त्याचे वरिष्ठ जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कौतुक केले आहे
Comments
Post a Comment