विद्यार्थानी ज्ञाना बरोबरच खेळाला महत्व द्यावे- अध्यक्ष अरुण तनपुरे

विद्यार्थानी ज्ञाना बरोबर खेळाला महत्व द्यावे -अध्यक्ष अरुण तनपुरे
राहुरी : आपल्या पूर्वजांनी उभारलेल्या संस्थांना पुन्हा नवसंजीवनी देणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, तसेच ज्ञाना बरोबर खेळाला महत्व द्यावे 
असे प्रतिपादन डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी केले. संत ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित सेवापूर्ती गौरव समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विद्यमान संचालिका मीनाताई करपे होत्या.
पुढे बोलताना तनपुरे म्हणाले की, राहुरी तालुक्याला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर बंद असलेला तनपुरे साखर कारखाना सुरू करणे अत्यावश्यक आहे. कारखान्याचा प्रकल्प अहवाल तयार झाला असून सध्या जिल्हा बँकेच्या ताब्यात असलेला हा कारखाना मुक्त करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. कारखान्यावर प्रशासक नियुक्त असल्यामुळे अपेक्षित वेगाने निर्णय होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कारखाना बंद असल्याने तालुक्यातील विकासाची गती मंदावली असून त्याचा मोठा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन कारखाना सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय, राहुरी महाविद्यालयासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च करून अत्याधुनिक इमारत उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच उत्तम खेळाडू म्हणून घडवण्यासाठी मंडळाच्या शाळांना आधुनिक क्रीडांगणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थी खेळात पुढे असतात; मात्र योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे ते मागे राहतात, असेही त्यांनी नमूद केले. तसेच खेळासोबत सैन्य भरतीसाठी मार्गदर्शन आणि विद्यार्थिनींवर चांगले संस्कार होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्रदीर्घ काळ सेवा बजावलेल्या बाबासाहेब चोथे, अन्सार सय्यद आणि सुभाष कोकाटे (सेवक) हे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला वैभव ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश करपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुरेश निमसे, डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर पवार, माजी उपाध्यक्ष श्याम निमसे, शिवशंकर करपे, उद्योजक राजेंद्र गायकवाड, शिक्षक बँकेचे संचालक संभाजी गाडे, मनसेचे तालुकाध्यक्ष भागवत नवाळे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे समन्वयक गीताराम चोथे, प्रगती विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव  शेळके मामा, तसेच विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे उपाध्यक्ष भारत वारुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध विद्यालयांतील आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युसूफ तांबोळी आणि सुभाष शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मृणाल मकासरे यांनी मानले .

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर