स्थानिक स्वराज्य विधानपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवार द्या

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेसाठी सत्यजित कदम यांच्या नावाची चर्चा; भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी
घाडगे न्यूज।विशेष प्रतिनिधी 
अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.
कदम कुटुंबाचे भारतीय जनता पक्षाशी असलेले जुने नाते लक्षात घेता पक्षाने त्यांच्या निष्ठेचा सन्मान करावा, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. जनसंघाच्या काळापासून कदम कुटुंब भाजपाशी एकनिष्ठ राहिले आहे. सत्यजित कदम यांचे आजोबा लक्ष्मण कदम यांनी जनसंघाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांना यश मिळाले नसले, तरी त्यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवली.
त्यानंतर भाजपाने माजी आमदार चंद्रशेखर कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. पोटनिवडणुकीत विजय मिळवत ते उत्तर नगर जिल्ह्यातील भाजपाचे पहिले आमदार ठरले. एकदा पराभव झाल्यानंतरही त्यांनी पुनश्च विजय मिळवत आमदारकी गाठली होती.
पुढे राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल झाल्यानंतर भाजपाने दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी दिली. त्यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला. त्यांच्या अकाली निधनानंतर पक्षाने त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आणि तेही आमदार झाले.
दरम्यान, भाजपाशी एकनिष्ठ राहूनही सत्यजित कदम यांना अद्याप मोठी संधी मिळालेली नाही, अशी खंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या राजकीय वाटचालीसाठी सत्यजित कदम यांनी संयमाची भूमिका घेतली होती. तसेच भाजपाने विवेक कोल्हे यांना आमदार केले, तर काही ठिकाणी इतर पक्षांतील नेत्यांच्या वारसांनाही संधी दिली. आमदार सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यापासून ते श्रीगोंदा मतदारसंघात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रम पाचपुते यांना उमेदवारी देण्यापर्यंत अनेक निर्णय पक्षाने घेतले आहेत.
मात्र, भाजपाच्या निष्ठावंत कुटुंबाचा विचार पक्ष करणार का, असा सवाल आता कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना संधी द्यावी, अशी मागणी भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अद्याप निवडणूक जाहीर झालेली नसली, तरी आवश्यक मतदारसंख्या उपलब्ध असल्याचा अहवाल शासन स्तरावर पाठविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण 569 मतदारांपैकी सध्या 461 सदस्य कार्यरत आहेत. हे प्रमाण 82.47 टक्के इतके असून, विधान परिषद निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या 75 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे अहिल्यानगरची जागा निवडणुकीस पात्र ठरू शकते, अशी माहिती निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून, त्यात अहिल्यानगर जिल्ह्याचाही समावेश असू शकतो. अंतिम निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाकडून घेतला जाणार आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांनंतर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक व कार्यरत जागांचा तपशील राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक शाखेकडून मागवून घेतला आहे. त्यामुळे राज्यातील इतर मतदारसंघांसोबतच अहिल्यानगरमध्येही विधान परिषद निवडणूक होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित असल्यामुळे जिल्हा परिषदेचे 75 सदस्य आणि पंचायत समितीचे 14 सभापती अशी एकूण 89 पदे रिक्त आहेत. तरीही महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील 461 सदस्य कार्यरत असल्याने निवडणूक घेण्यातील प्रमुख तांत्रिक अडचण दूर झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती मिळून एकूण 18 स्थानिक संस्थांमधील 569 जागा विधान परिषद मतदारसंघासाठी ग्राह्य धरल्या जातात. त्यापैकी सध्या महानगरपालिकेचे 73, नगरपालिकांचे 312 आणि नगरपंचायतींचे 76 असे एकूण 461 सदस्य कार्यरत आहेत. या सर्व सदस्यांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार राहणार आहे. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील अधिकृत अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला असल्याची माहिती समोर आली आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर