१८जुन रोजी स्थानिक स्वराज्य विधान परिषद मतदान २२ निकाल -डाॅ पंकज आशिया
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक मतदारसंघ
१८ जून रोजी मतदान, २२ जूनला मतमोजणी
४६१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
- जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ ची घोषणा केली असून, अहिल्यानगर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दत्तात्रय कवितके, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार विशाल सदनापूर आदी अधिकारी उपस्थित होते.
डॉ. आशिया यांनी सांगितले की, या निवडणुकीसाठी २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. उमेदवारांना १ जूनपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार असून, २ जून रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल. अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत ४ जून निश्चित करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत पार पडणार असून, २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जून रोजी पूर्ण होईल.
नामनिर्देशन अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील जिल्हाधिकारी दालनात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत स्वीकारले जाणार आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे नाव महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत असणे आवश्यक असून, त्याची साक्षांकित प्रत अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.
या निवडणुकीत जिल्ह्यातील महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे सदस्य मतदार म्हणून सहभागी होणार आहेत. अहिल्यानगर महानगरपालिका तसेच संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, श्रीगोंदा, शिर्डी, शेवगाव, नेवासा, कर्जत, अकोले, जामखेड आणि पारनेर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. एकूण ४६१ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
निवडणुकीसाठी मतपत्रिकेचा वापर करण्यात येणार असून मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागणार आहे. मतदानासाठी आवश्यक जम्बो बॅलेट बॉक्सची व्यवस्था करण्यात आली असून, संबंधित तालुक्यांच्या तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या कक्षात मतदान केंद्र कार्यरत राहणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी खुल्या प्रवर्गाकरिता १० हजार रुपये, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाकरिता ५ हजार रुपये इतकी अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट १९९५ तसेच भारत निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार सार्वजनिक अथवा खासगी मालमत्तेवर अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, भित्तीपत्रके, झेंडे किंवा घोषणाबाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.
Comments
Post a Comment