बेकायदेशीर ड्रोन प्रश्नी राहुरी पोलिसांचे दुर्लक्ष नागरिकांत संताप
ड्रोन।शिवाजी घाडगे
राहुरी तालुक्यात सध्या रात्रीच्या वेळी आकाशात फिरणाऱ्या संशयास्पद आणि बेकायदेशीर ड्रोनमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावोगावी रात्री उशिरापर्यंत घिरट्या घालणारे ड्रोन, वाढत्या चोरीच्या घटना, घरांचे दरवाजे ठोठावून दहशत निर्माण करणारे अज्ञात टोळके आणि त्याचवेळी स्थानिक पोलिसांची दिसणारी उदासीन भूमिका यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा विषय केवळ अफवा किंवा सामान्य तक्रारींचा नसून थेट कायदा-सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न बनला आहे.
तालुक्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांपासून रात्रीच्या काळोखात संशयास्पद ड्रोन फिरत असल्याचे अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे हे ड्रोन केवळ मनोरंजनासाठी किंवा छायाचित्रणासाठी वापरले जात नसून, परिसराची पाहणी, घरांची रेकी किंवा गुन्हेगारी हालचालींसाठी त्यांचा वापर होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी घरांचे दरवाजे वाजवणे, नागरिकांना घाबरवणे आणि त्याच भागात चोरीच्या घटना वाढणे या प्रकारांमुळे संशय अधिकच गडद होत आहे.
मात्र या गंभीर प्रश्नावर ठोस कारवाई करण्याऐवजी राहुरी पोलिसांकडून विषयाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका नागरिक करत आहेत. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी छायाचित्रकार संघटनांची मदत घेण्याबाबत केलेले वक्तव्य नागरिकांच्या रोषाचे कारण ठरत आहे. “फोटो ग्राफरचे ड्रोन आणि रात्री बेकायदेशीररीत्या फिरणारे संशयास्पद ड्रोन यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. प्रश्न केवळ छंदाचा नाही, तर सुरक्षेचा आहे,” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखल्याचे दिसून येत आहे. अँटी-ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने संबंधित ड्रोन ताब्यात घेऊन ते कोणाचे आहेत, कुठून नियंत्रित केले जात आहेत आणि त्यामागील उद्देश काय आहे, याचा तपास करण्याबाबत हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते, अत्याधुनिक अँटी-ड्रोन यंत्रणेशिवाय अशा बेकायदेशीर ड्रोनवर नियंत्रण मिळवणे शक्य नाही.
नागरिकांचा आरोप आहे की, पोलिसांनी वेळेवर कठोर पावले उचलली असती तर वाढत्या चोरीच्या घटनांवर आणि रात्री निर्माण होणाऱ्या दहशतीवर आळा बसला असता. रात्रीची गस्त अपुरी असल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत असून सामान्य नागरिक भयभीत जीवन जगत आहेत. “पोलीस बैठका घेऊन केवळ आश्वासने दिली जात आहेत; मात्र प्रत्यक्ष कृती दिसत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक गावांमधून उमटत आहे.
विशेष म्हणजे, ड्रोनचा विषय हा केवळ स्थानिक पातळीवरील त्रास नसून देशभरात संवेदनशील मानला जातो. सीमाभागांपासून ते महत्त्वाच्या औद्योगिक परिसरांपर्यंत ड्रोनचा गैरवापर होण्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. अशा परिस्थितीत राहुरीसारख्या ग्रामीण भागात रात्री अज्ञात ड्रोन मुक्तपणे फिरत असतील, तर तो अत्यंत चिंतेचा विषय असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
स्थानिक पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. बेकायदेशीर ड्रोन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, संशयितांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी जोरदार मागणी आता तालुकाभरातून होत आहे.
राहुरी तालुक्यातील नागरिकांचा एकच सवाल आहे — “ड्रोन आकाशात फिरत आहेत, चोऱ्या वाढत आहेत, लोक भयभीत आहेत; मग प्रशासन नेमके जागे होणार कधी?”
Comments
Post a Comment