विधानसभेचे संभापती प्रा राम शिंदे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या निवासस्थानी

देवळाली प्रवरात कदम निवासस्थानी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

घाडगे न्यूज। प्रतिनिधी
होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी रात्री देवळाली प्रवरा येथे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
शनिवारी रात्री सुमारे नऊ  वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आगामी विधान परिषद निवडणूक लढवावी, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रा. राम शिंदे यांच्या या भेटीकडे संभाव्य राजकीय संकेत म्हणून पाहिले जात आहे.
राज्यातील भाजप नेतृत्वात प्रा. राम शिंदे यांचे महत्त्वाचे स्थान मानले जाते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध असल्याने, कदम कुटुंबाला पक्षाची साथ मिळाल्यास सत्यजित कदम यांच्या उमेदवारीचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो, अशी चर्चा समर्थकांमध्ये रंगू लागली आहे. “राम ज्यांच्या पाठीशी उभे राहतात, त्यांच्याच कपाळी विजयाचा गुलाल लागतो,” अशा प्रतिक्रिया स्थानिक राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहेत.
या भेटीदरम्यान माजी आमदार चंद्रशेखर कदम, नगराध्यक्ष सत्यजित कदम तसेच कदम कुटुंबीय उपस्थित होते. भेटीतील चर्चेचा अधिकृत तपशील समोर आलेला नसला, तरी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने या भेटीकडे महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी “मी दिवंगत अण्णासाहेब कदम यांचा अनुयायी आहे,” असे सांगत माजी आमदार चंद्रशेखर कदम यांना उमेदवारी देऊन विधानसभेत पाठविले होते, अशी आठवणही यावेळी समर्थकांकडून काढली जात आहे. त्याच धर्तीवर आता सत्यजित कदम यांनाही भाजपकडून संधी मिळणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
राजकीय चर्चांमध्ये तरुण कार्यकर्त्यांमधून उपरोधिक प्रतिक्रिया देखील उमटताना दिसत आहेत. भाजपने स्थानिक नेतृत्वाला संधी न दिल्यास तरुणांमध्ये नाराजी वाढू शकते, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर