राहुरीला मिळणार आणखी एक आमदार?

राहुरीला मिळणार आणखी एक आमदार?
राजरंग।शिवाजी घाडगे 
अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव व राहुरी हे राजकारणात अतिशय जागृत तालुके आहेत कोपरगावला दोन आमदार झाले तसे राहुरीला ही दोन आमदार मिळणार अलिकडेच आमदार अक्षय कर्डीले अलिकडेच राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकीत भाजपाचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील राहुरीला उमेदवारी मिळु शकते फक्त उमेदवार प्राजक्त तनपुरे की सत्यजित कदम हा विषय कदाचित राहुरीला उमेदवारी मिळाली तर कोपरगाव प्रमाणे राहुरीला देखील दोन आमदार मिळु शकतात व फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करु शकतात अशी राजकीय चर्चा आहे 
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध पक्षांतील संभाव्य उमेदवारांच्या चर्चांना वेग आला आहे. विशेषतः राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, ते भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्त तनपुरे हे मंगळवारी अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषद निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र दाखल करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
राहुरी विधानसभा निवडणुकीत आमदार अक्षय कर्डिले यांनी केलेल्या राजकीय मदतीचे “रिटर्न गिफ्ट” आता प्राजक्त तनपुरे यांना मिळणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे तनपुरे हे अभ्यासू, संयमी आणि मितभाषी नेतृत्व म्हणून ओळखले जात असल्याने भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचीही चर्चा रंगली आहे.
सध्या राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची सत्ता असून काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे विरोधी आघाडीत आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघाची जागा भाजप लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न असून निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत पक्ष आग्रही असल्याचे बोलले जात आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतांच्या गणितात भाजपकडे सुमारे १८१ मते, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे ६१, तर शिवसेना (शिंदे गट) कडे ४३ मते असल्याचे सांगितले जाते. या तिन्ही पक्षांची मिळून जवळपास २८५ मतांची ताकद मानली जात आहे.
दुसरीकडे काँग्रेसकडे ३०, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे २७, संगमनेर विकास आघाडीकडे २८, राहुरी विकास आघाडीकडे १६, नेवासा शेतकरी विकास आघाडीकडे १०, तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे गट) व अन्य मिळून ४१ मते असल्याचे चित्र आहे. एकूण सुमारे ४६१ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
भाजप व मित्रपक्षांकडून उमेदवारीसाठी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, अॅड. अभय आगरकर, भानुदास बेरड, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांची नावे चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक, घनश्याम शेलार, सचिन जगताप  यांची नावे चर्चेत आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्याकडून मात्र अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे विरोधकांचा उमेदवार कोण, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक असून भाजपने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा दबाव त्यांच्या समर्थकांकडून वाढत असल्याची चर्चा आहे. “अभी नहीं तो कभी नहीं” अशी भावना त्यांच्या समर्थकांमध्ये दिसून येत आहे.
दुसरीकडे भाजप कोपरगाव, शिर्डी आणि राहुरी परिसरात मजबूत संघटनात्मक जाळे उभे करण्याच्या तयारीत असून भविष्यातील राजकारण लक्षात घेऊन अभ्यासू आणि संयमी नेतृत्वाला पक्षात स्थान देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्राजक्त तनपुरे यांना पसंती असल्याची चर्चा रंगली आहे.
मात्र, केवळ १६ नगरसेवकांच्या बळावर असलेल्या नेतृत्वाला भाजप उमेदवारी देणार का, असा सवाल पक्षातील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अखेर भाजपची उमेदवारी सत्यजित कदम यांना मिळणार की प्राजक्त तनपुरे यांना, याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर