बेकायदेशीर ड्रोन आणि चोरट्यांच्या दहशतीने झोपा उडाल्या
ड्रोन।शिवाजी घाडगे
राहुरी तालुक्यात सध्या रात्रीच्या शांततेला भीतीची किनार लाभली आहे. रात्री आकाशात घिरट्या घालणारे संशयास्पद बेकायदेशीर ड्रोन, गावोगावी वाढलेला चोरट्यांचा वावर आणि प्रशासनाची संथ भूमिका यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत फिरणारे ड्रोन नेमके कोण उडवत आहे, त्यामागचा उद्देश काय आहे, आणि प्रशासन अद्याप निष्क्रिय का आहे, असे अनेक प्रश्न आता नागरिकां मध्ये चर्चीले जात आहेत.
रात्रीच्या वेळी गावांच्या परिसरात, शेतभागात आणि वस्तींच्या वरून फिरणारे ड्रोन नागरिकांच्या भीतीत अधिक भर टाकत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी हे ड्रोन प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला आहे. काही ठिकाणी ड्रोनच्या आवाजामुळे लोक रात्री घराबाहेर पडत आहेत, तर काही गावांमध्ये महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे. आधीच वाढत्या चोरी, घरफोड्या आणि संशयास्पद हालचालींमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांच्या मनात आता “या ड्रोनचा आणि चोरट्यांचा काही संबंध आहे का?” असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
मुळात कोणतेही ड्रोन ऑपरेटरशिवाय उडू शकत नाही. म्हणजेच हे ड्रोन उडवणारे व्यक्ती संबंधित परिसरात किंवा काही अंतरावर उपस्थित असण्याची शक्यता स्पष्टपणे नाकारता येत नाही. त्यामुळे गावांमध्ये अचानक दिसणारे अनोळखी चेहरे, रात्री उशिरा फिरणाऱ्या संशयास्पद वाहनांच्या हालचाली आणि ओसाड भागातील वावर यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनी स्वतः जागरूक राहून गावपातळीवर सतर्कता समित्या तयार करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ड्रोनचा विषय चर्चेत असताना अद्याप एकाही ड्रोन ऑपरेटरचा शोध लागलेला नाही, ही बाब अधिक चिंताजनक आहे. पोलिस प्रशासनाने काही भागात गस्त वाढवल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या मनातील भीती कमी झालेली दिसत नाही. उलट “प्रशासन नेमके काय करत आहे?” असा संतप्त सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. जर इतक्या दिवसांपासून बेकायदेशीर ड्रोन उडत असतील, तर त्यांचा मागोवा घेण्यात यंत्रणा अपयशी का ठरत आहे? तंत्रज्ञानाच्या युगात ड्रोनचा शोध घेणे इतके कठीण आहे का? असे प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, नागरिक रात्री कोणताही आवाज झाला तरी दचकून जागे होत आहेत. ग्रामीण भागातील लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून पालकांना आपल्या मुलांच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली आहे. काही गावांमध्ये तर नागरिकांनी रात्री पहारा देण्यास सुरुवात केली आहे. ही परिस्थिती प्रशासनासाठी धोक्याची घंटा मानली पाहिजे.
समाजात वाईट प्रवृत्ती आणि गुन्हेगारी मानसिकतेचे संघटन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होताना दिसत आहे. अशा वेळी जर सामान्य नागरिक एकजूट आणि सतर्क राहिले नाहीत, तर भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. कायद्यावर विश्वास ठेवणारा नागरिक कधीही कायदा हातात घेण्याचा विचार करत नाही. मात्र जेव्हा कायद्याचे रक्षण करणारेच शांत आणि निष्क्रिय दिसतात, तेव्हा गुन्हेगारांची मानसिकता अधिक बळावते आणि दहशतीचे वातावरण वाढण्यास खतपाणी मिळते.
राहुरी तालुक्यात निर्माण झालेली ही परिस्थिती केवळ “ड्रोन फिरत आहेत” इतकी साधी नाही; तर ती ग्रामीण सुरक्षाव्यवस्थेवरील गंभीर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांनी तातडीने संयुक्त मोहीम राबवून बेकायदेशीर ड्रोन उडवणाऱ्यांचा शोध घ्यावा, रात्रीची गस्त अधिक प्रभावी कराव्या आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
एकीकडे अफवा म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही तर वस्तुस्थिती देखील पहावी लागेल
Comments
Post a Comment