नगरच्या साखर लाॅबीवर "देवाभाऊ" ची गोड कृप्रा !
राजरंग।शिवाजी घाडगे
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये घेण्याच्या हालचालींमुळे जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील साखर लॉबी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर करण्यासाठी काही राजकीय आणि धार्मिक नेत्यांनी पूर्वी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. त्या पार्श्वभूमीवर नाशिकचे तथाकथित ‘कॅप्टन’ म्हणून ओळखले जाणारे अशोक खरात यांचे नाव चर्चेत आले होते. अशोक खरात यांच्याशी संबंधित काही कथित फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स समोर आल्यानंतर त्यांच्या तथाकथित बुवाबाजीच्या साम्राज्याला मोठा धक्का बसल्याचे बोलले गेले. यानंतर एसआयटी चौकशीसह विविध घटनांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच महायुतीतील वरिष्ठ नेत्यांशी घेतलेल्या बैठकीनंतर राज्यातील राजकीय निर्णयप्रक्रियेत त्यांचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याची चर्चा आहे. त्यानंतरच प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचालींना वेग आल्याचे मानले जात आहे.
विशेष म्हणजे, प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा केवळ एका नेत्याचा पक्षांतराचा विषय नसून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राजकीय धक्का देण्याची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद जागा पारंपरिकरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मानली जात होती. दिवंगत आमदार अरुण काका जगताप यांनी या मतदारसंघावर दीर्घकाळ प्रभाव ठेवला होता. त्यामुळे ही जागा पुन्हा राष्ट्रवादीकडेच जाईल, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र भाजपने जिल्ह्यातील प्रभावी साखर सम्राट आणि स्थानिक नेत्यांना आपल्या गोटात घेत राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात केली आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे सक्रिय न राहिल्याने भाजपचे आमदार अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवता आला. आता तनपुरे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन अल्पावधीतच विधान परिषद उमेदवारी देण्याची चर्चा सुरू असल्याने जिल्ह्यातील राजकारण अधिक रंगतदार झाले आहे.
दरम्यान, विधान परिषद आमदार विवेक कोल्हे यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आपल्या छातीवर विधान परिषदेचा बिल्ला लावल्याचा उल्लेख करत, “आपल्याला राजकीयदृष्ट्या घायाळ करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आपणच घातक ठरू,” असा इशारावजा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
तसेच संगमनेरचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीत पाठिंबा दिला होता. काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळूनही त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर प्राजक्त तनपुरे यांनीही राष्ट्रवादीचा अधिकृत एबी फॉर्म असूनही उमेदवारी नाकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Comments
Post a Comment