बोगस डॉक्टर चा गुण पदवी मौनात?

बोगस डॉक्टरचा “गुण” आणि पदवी मौनात !
 काहूर।शिवाजी घाडगे 
राहुरी तालुक्यात नुकत्याच घडलेल्या एका कारवाईने संपूर्ण परिसरात चर्चेचे वादळ उठवले आहे. एका निसर्गोपचार केंद्रावर प्रशासनाने धाड टाकत संबंधित डॉक्टरला अटक केली आणि तो “बोगस” असल्याचा ठपका ठेवत थेट जेलची हवा दाखवली. कायद्याच्या दृष्टीने ही कारवाई योग्यच असेल; पण या घटनेनंतर गावागावात, चौकाचौकात आणि चहाच्या टपऱ्यांवर एक उपहासात्मक पण बोचरा प्रश्न चर्चिला जात आहे  “जर तो इतकाच बोगस होता, तर त्याच्याकडे रोज शंभरहून अधिक रुग्ण उपचारासाठी का जात होते?”
हा प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही; तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरच तो उपरोधिक भाष्य करणारा ठरत आहे. कारण लाखो रुपये खर्च करून पदव्या घेणारे, इंग्रजीत प्रिस्क्रिप्शन लिहिणारे आणि क्लिनिकच्या बोर्डावर नावामागे दहा-दहा अक्षरे लावणारे अनेक “अधिकृत” डॉक्टर रुग्णांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरत असताना, एका गावाकडच्या उपचारकाकडे एवढी गर्दी का होत होती?
काही जण तर उपहासाने म्हणू लागले आहेत, “हे काय लातूर पॅटर्नचे विद्यार्थी होते का? परीक्षा पास झाल्या; पण रुग्णांच्या मनात पास होऊ शकले नाहीत!”
कारण पदवी मिळवणे आणि लोकांचा विश्वास मिळवणे यात जमीन-अस्मानाचा फरक असतो.
निसर्गोपचार पद्धतीबद्दल लोकांमध्ये आकर्षण आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. औषधांपेक्षा आहार, दिनचर्या आणि नैसर्गिक उपचारांवर भर देणारी ही पद्धत अनेकांना भावते. मात्र, संबंधित व्यक्तीकडे अधिकृत वैद्यकीय पात्रता नसल्यास त्याने औषधे देणे, निदान करणे किंवा गंभीर उपचार करणे हे कायद्याने चुकीचेच ठरते. कदाचित त्याने एखाद्या अधिकृत डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली काम केले असते, तर ही वेळ आली नसती.
विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती बारानांदूर येथील शेतकरी कुटुंबातील असल्याचे सांगितले जाते. ग्रामीण भागातून आलेला हा माणूस नेमका कोणत्या “गुणा”मुळे लोकांच्या गळ्यातला ताईत बनला, हा देखील अभ्यासाचा विषय आहे. काहींच्या मते तो रुग्णांशी प्रेमाने बोलत होता, वेळ देत होता, त्यांच्या वेदना ऐकत होता. आणि आजच्या “कॉर्पोरेट” आरोग्य व्यवस्थेत हाच प्रकार दुर्मिळ झाला आहे.
आज परिस्थिती अशी झाली आहे की, काही ठिकाणी रुग्ण तपासण्यापेक्षा फाईल तपासली जाते आणि आजार समजून घेण्यापेक्षा बिल किती वाढेल याचा अंदाज घेतला जातो. त्यामुळे लोक उपहासाने म्हणतात, “बोगस डॉक्टरचा गुण येतो; पण ओरिजिनलचा का नाही?”
अर्थात, कायदा हा कायदाच असतो. बनावट पदवी, खोटी माहिती किंवा नियमबाह्य उपचार यांना समर्थन देता येणार नाही. पण या घटनेने आरोग्य व्यवस्थेतील एक मोठी पोकळी उघडी पडली आहे. लोकांना केवळ पदवी नको आहे; त्यांना विश्वास, माणुसकी आणि परिणामकारक उपचार हवे आहेत.
आता पुढचा उपरोध असा सुरू झाला आहे की, जेलमधून बाहेर आल्यानंतर जर या “बोगस डॉक्टरने” काम मिळाले नाही, तर तो एखाद्या राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर दिसला तरी आश्चर्य वाटू नये! कारण आपल्या देशात आरोप जितके मोठे, तितकी राजकीय एंट्री अधिक भव्य होत असल्याची लोकांची भावना बनत चालली आहे.
एकंदरीत, या प्रकरणाने प्रशासन, आरोग्य व्यवस्था आणि समाज या तिन्ही घटकांना आरसा दाखवला आहे. प्रश्न एका बोगस डॉक्टरचा नाही; प्रश्न असा आहे की, लोकांना “गुण” कुठे दिसतो आणि “पदवी” कुठे हरवते?
या आजारावर नेमका उपचार काय 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर