मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वेने येत आहेत शिर्डीला
घाडगे न्यूज। प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी शिर्डी येथे होणाऱ्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी रेल्वेने रवाना झाले आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून पहाटे ५.५० वाजता त्यांनी रेल्वेने शिर्डीकडे प्रस्थान केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेकदा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यावर भर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुख्यमंत्री शिर्डीतील कार्यक्रमानंतर सायंकाळी नागपूरकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री रेल्वेने प्रवास करत असल्यामुळे साधेपणा आणि खर्च बचतीचा संदेश दिला जात असला, तरी दुसरीकडे शिर्डीतील संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. त्यात स्थानिक स्वराज्य विधान परिषद ची आचार संहिता देखील लागु आहे.
विशेषतः कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसिद्धी यंत्रणा वापरण्यात येत असल्याने लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचे बोलले जात आहे. संबंधित संरक्षण उत्पादन प्रकल्प खाजगी कंपनीमार्फत कार्यान्वित केला जात असताना, सोहळ्यासाठी शासकीय यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात वापर आणि खर्च केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
जिल्ह्याला काय होणार फायदा?
शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये निबे यांच्या अत्याधुनिक संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे लोकार्पण देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या औद्योगिक, आर्थिक आणि रोजगारवाढीच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे. संरक्षण साहित्य उत्पादन क्षेत्रात जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास या प्रकल्पामुळे चालना मिळणार असून “मेक इन इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” या केंद्र सरकारच्या संकल्पनांना बळकटी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकल्पामुळे सुमारे दोन हजार युवकांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यात या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढून स्थानिक उद्योग, पूरक व्यवसाय आणि आर्थिक विकासालाही चालना मिळू शकते, असा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे.
लोकार्पण सोहळ्यानिमित्त संरक्षण उत्पादन क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्यांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्वदेशी उत्पादन क्षमता आणि औद्योगिक नवसंकल्पनांचे दर्शन घडविणारे १०० हून अधिक स्टॉल्स या प्रदर्शनात उभारण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक उद्योजक, युवक आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित घटकांना संरक्षण उत्पादन क्षेत्रातील नव्या संधी आणि आधुनिक तंत्रज्ञान जवळून अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
हा प्रकल्प केवळ औद्योगिक विकासाचा टप्पा नसून अहिल्यानगर जिल्ह्याला राष्ट्रीय संरक्षण उत्पादन क्षेत्राच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून देणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरणार असल्याचे मानले जात आहे.
सहकार क्षेत्राकडेही लक्ष देण्याची अपेक्षा
शिर्डीमध्ये कोणताही मोठा प्रकल्प किंवा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रद्धा आणि जनसहभाग महत्त्वाचा मानला जातो. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील सहकारी चळवळ अनेक ठिकाणी अडचणीत सापडत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. औद्योगिक विकासाबरोबरच सहकार क्षेत्रालाही “मेक इन इंडिया” आणि ग्रामीण आर्थिक सक्षमीकरणाच्या धोरणातून बळ देण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
Comments
Post a Comment