माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपात

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपात?
राहुरी।शिवाजी घाडगे 
अहिल्यानगर च्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे दिसू लागली असून  माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. येत्या ३० मे रोजी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती राजकीय विश्वासू सूत्रांकडून समोर येत आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अलिकडेच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीपासूनच प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष मदत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरीतील प्रचारसभेत जाहीरपणे प्राजक्त तनपुरे यांचे नाव घेत त्यांचे आभार मानले होते. त्या भाषणानंतर तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक वेग आला होता.
दरम्यान, प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण तनपुरे हे केवळ माजी मंत्री नसून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यामुळे या प्रवेशाला केवळ पक्षांतर न मानता एक मोठा राजकीय संदेश म्हणूनही पाहिले जात आहे.
प्राजक्त तनपुरे यांची राजकीय पार्श्वभूमी अत्यंत मजबूत मानली जाते. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे यांनी जवळपास २५ वर्षे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तर त्यांचे आजोबा डॉ. बाबुराव तनपुरे हे राज्यातील सहकार चळवळीतील प्रभावी नेते, आमदार आणि शैक्षणिक क्षेत्रातील मोठे नाव होते. त्यामुळे तनपुरे कुटुंबाला राहुरी तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात मोठे राजकीय वजन आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मोठा कार्यकर्ता वर्ग असून ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव कायम असल्याचे मानले जाते. सहकार, शिक्षण आणि साखर उद्योग क्षेत्रातही त्यांचे मजबूत नेटवर्क आहे. त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास भाजपला स्थानिक पातळीवर मोठी राजकीय ताकद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर आणि परिसरातील राजकीय समीकरणांवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो.
सध्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मोठे संख्याबळ असल्याने भाजपच्या उमेदवाराचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे तनपुरे यांना विधान परिषदेत पाठवण्याची रणनीती आखली जात असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान भाजपला सहकार्य केल्याच्या बदल्यात प्राजक्त तनपुरे यांना “रिटर्न गिफ्ट” म्हणून आमदारकी मिळणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत तनपुरे यांना भाजपमध्ये आणल्याचे बोलले जात असून, आगामी काळात त्यांना राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका दिली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुढील भूमिका काय घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. तनपुरे यांच्यासोबत मोठा कार्यकर्ता वर्ग भाजपमध्ये जाणार , याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

Comments