विधानपरिषदे साठी कदम कदम बढाते जाये
घाडगे न्यूज।प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत अहिल्यानगरची जागा भारतीय जनता पक्ष लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून इच्छुक उमेदवारांनीही पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
देवळाली प्रवरा नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी या निवडणुकीसाठी सक्रिय भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फिल्डिंग लावल्याची चर्चा राजकीय स्तरावर रंगू लागली आहे. जिल्ह्यात भाजपाच्या एकनिष्ठ आणि पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या कुटुंबातील सदस्याला विधान परिषदेत संधी मिळावी, अशी भावना पक्षातील काही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या उमेदवारीसाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम हे देखील प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर उद्योजक जगदीश कदम यांनीही पक्षातील संबंध अधिक दृढ करत विविध स्तरांवर राजकीय जुळवाजुळव सुरू केल्याची चर्चा आहे. “कदम कदम बढाते जाये” या भूमिकेतून विधान परिषद आमदारकीसाठी कदम कुटुंबाने रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या निवडणुकीत भाजपाकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्वाधिक मतदार असल्याने पक्षाची ताकद भक्कम मानली जात आहे. जिल्ह्यातील एकूण ४६१ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेता भाजपालाही विधान परिषदेत आपली संख्याबळ वाढवण्याची मोठी संधी असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.
महायुतीमधील पक्षांच्या दाव्यानुसार जागांची प्राथमिक विभागणी खालीलप्रमाणे आहे.
भाजप (12 जागा):
नागपूर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, सातारा-सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा-गोंदिया, अमरावती, लातूर-धाराशीव-बीड आणि सोलापूर.
शिवसेना (3 जागा):
ठाणे, नाशिक आणि यवतमाळ.
राष्ट्रवादी काँग्रेस (2 जागा):
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हिंगोली-परभणी.
Comments
Post a Comment