अक्षय कमळाच्या विजयात दडली जबादारीची जाणीव

 अक्षय कमळाच्या विजयात  दडलेली जबाबदारीची जाणीव
 राजरंग।शिवाजी घाडगे
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हा केवळ एका उमेदवाराच्या विजयापुरता मर्यादित नाही, तर तो स्थानिक राजकारणातील भावनिक लाट, पक्षनिष्ठा आणि वारशाच्या सातत्याचा महत्त्वाचा दाखला ठरला आहे. आमदार अक्षय कर्डीले यांनी मिळवलेला दणदणीत विजय हा भाजपासाठी गड कायम राखणारा ठरला, पण त्यामागे असलेल्या भावना आणि वास्तव याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली पोकळी अजून भरून निघालेली नाही. त्यांनी उभारलेली राजकीय ताकद, मतदारांशी असलेला जिव्हाळा आणि विकासकामांची परंपरा यामुळेच राहुरीत ‘कमळ’ पुन्हा फुलले होते. त्याच वारशाची धुरा आता त्यांच्या पुत्राच्या खांद्यावर आली आहे. मात्र, वारसा मिळवणे जितके सोपे दिसते, तितके तो टिकवणे कठीण असते हे वास्तव नव्या आमदारांसमोर उभे आहे.
या निवडणुकीत सहानुभूतीची लाट, पक्षयंत्रणेची ताकद आणि राज्य-केंद्रातील सत्तेचा प्रभाव हे सर्व घटक अक्षय कर्डीले यांच्या बाजूने होते. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवून सर्वतोपरी प्रयत्न केले, आणि त्याचे फळ विजयाच्या रूपाने मिळाले. मात्र, निवडणूक जिंकणे हा शेवट नसून तो एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे, याची जाणीव आता अधिक तीव्रतेने ठेवावी लागेल.
विजयानंतर घडलेला भावनिक प्रसंग आई अलकाताई यांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी “हे सगळं सांभाळायचं आहे” असे दिलेले सांगणे हा केवळ कौटुंबिक क्षण नव्हता, तर तो सार्वजनिक जबाबदारीची जाणीव करून देणारा होता. त्या एका वाक्यात मतदारसंघाच्या अपेक्षा, वडिलांच्या अपूर्ण स्वप्नांचा भार आणि लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या कर्तव्यांची जाणीव दडलेली आहे.
ऐतिहासिक विजयानंतरही आनंदाश्रूंनी भरलेला एक हृदयस्पर्शी क्षण सर्वांच्या डोळ्यांत साठून राहिला. लाखोंच्या मताधिक्याने विजय मिळवत आमदारपदी विराजमान झालेल्या अक्षय कर्डीले यांच्या घरात जल्लोषाचा माहोल होता; मात्र या आनंदाला भावनांचा कडवट स्पर्शही होता.
राहुरीच्या मतदारांनी मोठ्या विश्वासाने हा कौल दिला आहे. हा विश्वास केवळ भावनेवर टिकून राहणार नाही; तो विकासकामे, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक नेतृत्व यावरच टिकेल. विरोधकांनीही या निकालातून आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. लोकशाहीत सशक्त विरोधक हे तितकेच आवश्यक असतात.
आजचा हा विजय आनंदाचा असला, तरी तो जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. अक्षय कर्डीले यांच्यासाठी हा क्षण केवळ राजकीय यशाचा नसून, एका वारशाला न्याय देण्याचा आणि जनतेच्या अपेक्षांना पूर्ण करण्याचा आहे. राहुरीच्या विकासाचा मार्ग आता त्यांच्या निर्णयांवर आणि कार्यपद्धतीवर अवलंबून असेल.
विजयाच्या जल्लोषात हरवून न जाता, त्या मागील संदेश ओळखून पुढील वाटचाल ठरवणे हाच खरा या निकालाचा सार आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर