हरित कवच विस्तार 7लाख 65 वृक्ष लागवडीचे उदिष्ट
अहिल्यानगर जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी आणि जिल्ह्याचे हरित कवच अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाने व्यापक वृक्षलागवड मोहिमेचे नियोजन केले आहे. हवामान बदल, वाढते तापमान आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यावर्षी १४ तालुक्यांमध्ये किमान ७ लाख ६५ हजार १८ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी जिल्ह्यातील १० हजार ५७५ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, वन विभागाची क्षेत्रे, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, नगरपालिका तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही वृक्षलागवड करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी सर्व घटकांचा सहभाग वाढविण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
या उपक्रमात ग्रामपंचायतींचा सर्वाधिक सहभाग राहणार असून जिल्ह्यातील १ हजार ३२७ ग्रामपंचायतींमार्फत तब्बल २ लाख ११ हजार ३०० रोपांची लागवड केली जाणार आहे. ग्रामीण भागात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी ग्रामपंचायतींना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्यात येणार आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून १ लाख ३८ हजार २३० रोपे लावली जाणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच वृक्षसंवर्धनाची सवय रुजविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
तसेच महिला व बालविकास विभागाच्या ३ हजार ४३३ केंद्रांवर १८ हजार १०५ रोपांची लागवड करण्यात येणार असून अंगणवाडी आणि संबंधित संस्थांमार्फत पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला जाणार आहे.
याशिवाय विविध सेवाभावी आणि स्वयंसेवी संस्थांकडून तब्बल ३ लाख १८ हजार ७५८ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. समाजातील विविध घटकांचा सहभाग वाढवून वृक्षलागवड ही केवळ शासकीय मोहीम न राहता लोकचळवळ बनविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
जिल्ह्यातील हरित क्षेत्र वाढविणे, भूजल पातळी सुधारण्यास मदत करणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि भावी पिढ्यांसाठी निरोगी पर्यावरण निर्माण करणे हा या व्यापक वृक्षलागवड मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. वृक्षलागवडीनंतर त्यांचे संवर्धन आणि संगोपन यावरही विशेष भर देण्यात येणार असल्याने ही मोहीम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Comments
Post a Comment