दुसर्‍याच पक्षांतर पाप स्वतःच मात्र पुण्य

दुसऱ्यांचे पक्षांतर पाप, स्वतःचे पुण्य
राजरंग।शिवाजी घाडगे 
राजकारणात पक्षांतर हा काही नवीन विषय नाही. मात्र एखादा नेता पक्ष बदलतो तेव्हा त्याच्या निर्णयाचे मूल्यमापन तत्त्वांवर कमी आणि राजकीय सोयीसुविधांवर अधिक केले जाते, हे वारंवार दिसून येते. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर सुरू झालेल्या प्रतिक्रिया त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल.
जेव्हा एखादा नेता आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो, तेव्हा त्याला "विचारधारेशी प्रतारणा", "संधीसाधूपणा" किंवा "स्वार्थी राजकारण" अशा विशेषणांनी हिणवले जाते. मात्र इतिहास पाहिला तर जवळपास सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या काळात इतर पक्षांतील प्रभावी नेत्यांचे स्वागत केले आहे. त्यावेळी विचारधारा आणि निष्ठेचे निकष अनेकदा मागे पडतात आणि राजकीय गणिते पुढे येतात.
प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे विरोधकांना धक्का बसणे स्वाभाविक आहे. कारण एखादा प्रभावी नेता पक्ष सोडतो तेव्हा केवळ एक व्यक्ती जात नाही, तर त्याच्यासोबत कार्यकर्त्यांचा एक वर्ग, स्थानिक प्रभाव आणि राजकीय समीकरणेही बदलतात. त्यामुळे विरोधकांच्या प्रतिक्रियांमध्ये राजकीय वेदना दिसणे साहजिक आहे. मात्र त्याच वेळी हा निर्णय लोकशाही व्यवस्थेतील एका नेत्याचा वैयक्तिक आणि राजकीय अधिकार आहे, हेही विसरून चालणार नाही.
राजकारणात एक प्रश्न कायम उपस्थित होतो—दुसऱ्याने घेतलेला निर्णय चुकीचा आणि आपण घेतलेला निर्णय योग्य, असा दुहेरी निकष कितपत योग्य आहे? अनेक पक्षांतील मोठमोठे नेते वेळोवेळी पक्ष बदलत आले आहेत. काहींना त्यावेळी "दूरदृष्टीचा निर्णय" म्हटले जाते, तर काहींना "गद्दारी"चे लेबल लावले जाते. हा विरोधाभास जनतेलाही दिसत असतो.
खरे तर एखादा नेता कोणत्या पक्षात आहे यापेक्षा त्याने जनतेसाठी काय केले, विकासासाठी किती योगदान दिले आणि आपल्या मतदारसंघाशी किती प्रामाणिक राहिला, यावर त्याचे मूल्यमापन व्हायला हवे. पक्षांतराच्या चर्चेपेक्षा जनतेच्या प्रश्नांवर चर्चा अधिक व्हावी, हीच लोकशाहीची अपेक्षा आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाने काहींच्या भुवया उंचावल्या असतील, काहींची राजकीय गणिते बिघडली असतील; पण अंतिम निर्णय जनतेचाच असतो. राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, कायमस्वरूपी असते ती सत्ता आणि जनतेचा कौल. त्यामुळे पक्षांतरावर टीका करणाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण राजकारणात दुसऱ्यांचे पक्षांतर पाप आणि स्वतःचे पुण्य, हा दृष्टिकोन फार काळ टिकत नाही.
राजकीय वर्तुळात आणखी एक चर्चा रंगली आहे. खासदार संजय राऊत यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या निर्णयावर टीका केली असली, तरी त्यांनी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आपले पद सोडण्याची तयारी दाखवली आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील विविध राजकीय निर्णयांच्या संदर्भानेही तुलना केली जात असून, एका नेत्याचा पक्षांतराचा निर्णय चुकीचा आणि दुसऱ्याचा योग्य कसा मानला जाऊ शकतो, याबाबत चर्चा सुरू आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, प्राजक्त तनपुरे हे अभ्यासू आणि प्रशासनाचा अनुभव असलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वडिलांनी तब्बल २५ वर्षे राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, मात्र त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नव्हती. तर प्राजक्त तनपुरे यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाची वेगळी भूमिका आणि बदलत जाणारी राजकीय समीकरणे यामुळे राज्यातील पक्षांतराचे राजकारण नवे राहिलेले नाही. अशा परिस्थितीत प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राजक्त तनपुरे यांना थेट भाजपमध्ये प्रवेश देत विधान परिषद निवडणुकीसाठी संधी दिल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यासाठी हा राजकीय धक्का मानला जात असून, आगामी काळात या निर्णयाचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणात उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.
सोमवारी विधानपरिषद संभापती प्रा राम शिदे, अहिल्यानगर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खरात यांना बरोबर घेत प्राजक्त तनपुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

शहाबाज ही लोकसेवा कोण करेल यार